कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला. भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. तिच्यासह भारताच्या आणखी काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. तिसऱ्या कोरोना चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे.
एच एस प्रणॉयलाही कोरोना झाल्याचे वृत्तसमोर येत आहे, तर सायनाचा पती पारुपल्ली कश्यप याला वैद्यकिय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
६ जानेवारीला झालेल्या कोरोना चाचणीत सर्व सहभागी ८२४ खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. ''मायदेश सोडण्यापूर्वी सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट सादर केला होता आणि बँकॉकमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली,''असे बॅडमिंटन फेडरेशननं सांगितलं. सयना व प्रणॉय यांना दहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. सायनाचा पती कश्यप यालाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. आज कश्यपचा पहिला सामना कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शू याच्याशी होणार होता. कश्यपला पुन्हा चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
यावर सायनानं प्रतिक्रिया दिली, काल कोरोना चाचणी झाल्यापासून मला अजूनही रिपोर्ट मिळालेला नाही. आज सामन्यापूर्वी सराव करत असताना मला कोरोना झाल्याचे सांगण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नियमानुसार पाच तासांपूर्वी रिपोर्ट येणं अपेक्षित असतं.