Saina Nehwal PV Sindhu Malaysia Masters Badminton: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. क्वालालंपूरमध्ये मलेशिया मास्टर्स 2022 च्या पहिल्या फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. पहिल्या फेरीतच बाद होण्याची ही सायनाची ही सलग दुसरी स्पर्धा आहे. लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल पहिला गेम जिंकूनही दक्षिण कोरियाच्या किम गा युनविरुद्ध २१-१६, १७-२१, १४-२१ अशी पराभूत झाली. पण दुसरीकडे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने मात्र विजयी सलामी दिली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पीव्ही सिंधूने बुधवारी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या हि बिंग जिओ हिचा पहिल्या फेरीतील चुरशीच्या सामन्यात पराभव करून प्रवेश केला. सातव्या मानांकित सिंधूने दुसरी फेरी गाठण्यासाठी जवळपास तासभर चाललेल्या लढतीत बिंग जिओचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बिंग जिओने सिंधूला पराभूत केले होते. या पराभवाचा सिंधूने बदला घेतला.
चीनच्या खेळाडूचा सिंधूविरुद्ध विजय-पराजयाचा विक्रम अजूनही १०-९ असा आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानी असलेली सायना गेल्या आठवड्यात मलेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेतून पहिल्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली होती. गेल्या काही काळापासून २४ आंतरराष्ट्रीय जेतेपदे जिंकणारी सायना खराब फॉर्मशी झगडत आहे. यामुळेच एकेकाळी टॉप-5 आणि टॉप-10 मध्ये असलेली सायना आता थेट २४व्या स्थानी फेकली गेली आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू होती. त्यामुळे तिने लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतावं अशी चाहत्यांचीही आशा आहे.