फुझाउ (चीन) : गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये राउंड रॉबिन फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर तीन महिन्यांनी भारताची अव्वल शटलर सायना नेहवाल पुन्हा एकदा कोर्टवर आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाली आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या चीन ओपन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेतून सायना दमदार पुनरागमन करेल.लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या सायनाला आपल्याहून कमी रँकिंग असलेल्या युक्रेनच्या मारिया उलीटिनाविरुद्ध पराभूत होऊन रिओ आॅलिम्पिकमधून गाशा गुंडाळावा लागला होता. यानंतर तिला आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली काही वेळ सराव केल्यानंतर तिने चीन ओपन स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत बाजी मारलेल्या सायनाला गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.पहिल्या फेरीत सायनापुढे थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासेरत्सुकचे आव्हान असेल. याआधी सायनाने पोर्नटिपला नऊ वेळा पराभूत केले आहे. मात्र, दुखापतीमुळे मोठ्या कालावधीनंतर कोर्टवर उतरत असलेल्या चौथ्या मानांकित सायनाला रेकॉर्ड महत्त्वाचे ठरणार नसल्याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच ती पोर्नटिपला गृहीत धरण्याची चूक करणार नाही.दुसरीकडे रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पटकावून चमकदार कामगिरी केलेल्या पी. व्ही. सिंधूचा कारकिर्दीतील पहिले सुपर सीरिज विजेतेपद पटकावण्याचा निर्धार आहे. या स्पर्धेत दोन वेळा दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागलेल्या सिंधूकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. चिनी तैपईच्या चिया सिन लीगविरुद्ध ती आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. (वृत्तसंस्था)
सायना नेहवाल पुनरागमनासाठी झाली सज्ज
By admin | Published: November 16, 2016 12:09 AM