Actor Siddharth Tweet Saina Nehwal : साऊथचा अभिनेता सिद्धार्थ आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत केलेल्या एका ट्वीटवरून तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, त्यावर आता राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. तसंच सिद्धार्थवर एफआयआर दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
सायना नेहवालनं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्वीट केलं होतं. यामध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडलं, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते, असं ट्वीट तिनं केलं होतं. याच ट्वीटव अभिनेता सिद्धार्थनं ट्वीट केलं होतं. तसंच यामध्ये त्यानं द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे शेम ऑन यू रिहाना असं लिहिलं होतं.
लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला. तसंच महिला आयोगानंही यासंदर्भात तक्रार केली. वादानंतर सिद्धार्थनं स्पष्टीकरण देत आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतल्याचं तो म्हणाला होता. तसंच कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही त्यानं म्हटलं होतं.
महिला आयोगाची कारवाई या प्रकरणानंतर महिला आयोगाकडून सिद्धार्थला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच आयटी अॅक्ट अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासही सांगण्यात आलं आहे. महिला आयोगानं ट्विटरला हे ट्वीट हटवण्यासंदर्भातही कारवाई करण्यास सांगितलं आहे. याशिवाय महिला आयोगानं मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. आयोग याप्रकरणी कारवाई करत असल्याची माहिती महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरद्वारे दिली. सिद्धार्थनं यापूर्वी रंग दे बसंती या चित्रपटातही भूमीका साकारली होती. यापूर्वी त्याच्या वक्तव्य, ट्वीटवरून वाद निर्माण झाला होता.