अव्वलस्थानही गमावले : कडव्या संघर्षानंतर सेमीफायनलमध्ये पराभूतक्वालालम्पूर : आॅलिम्पिक चॅम्पियन चीनची ली शुईरुई हिच्याविरुद्ध कडव्या संघर्षात अपयशी ठरलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला शनिवारी मलेशियन ओपन सुपर सिरीज प्रीमियर स्पर्धेच्या उपांत्य लढतीत पराभवाचा फटका बसल्याने स्पर्धेबाहेर व्हावे लागले. एक तास आठ मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात सायनाने पहिला गेम २१-१३ अशा फरकाने जिंकला खरा; पण जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या प्रतिस्पर्धी शुईरुईने मुसंडी मारून, नंतरचे दोन्ही गेम १७-२१, २०-२२ अशा फरकाने जिंकून सायनावर मात केली. या पराभवानंतर सायनाला अव्वलस्थानही गमवावे लागले. गेल्या आठवड्यात इंडियन ओपन सुपर सिरीजचे जेतेपद पटकविणाऱ्या सायनाला शुईरुईचे आव्हान मोडीत काढण्यात पुन्हा एकदा अपयश आले. चीनच्या शुईरुईचा सायनावर ११ सामन्यांपैकी हा नववा विजय ठरला. गेल्या वर्षी चायनीज ओपन जिंकल्यापासून शानदार फॉर्ममध्ये असलेल्या सायनाने शुईरुईचे प्रत्येक आव्हान परतवून लावले; पण मोक्याच्या क्षणी अपयश आल्याने विजयाने हुलकावणी दिली. (वृत्तसंस्था)इंडियन ओपन जिंकताच सायना नंबर वन बनली होती. सेमी फायनल गाठल्याने तिला ७७०० गुण मिळणार आहेत; पण शुईरुईने फायनलमध्ये धडा दिल्याने तीच पुन्हा अव्वलस्थानावर विराजमान होईल, हे निश्चित झाले आहे. सायनाने शुईरुईवर २०१० मध्ये सिंगापूर ओपन आणि २०१२ मध्ये इंडोनेशियन ओपनमध्ये विजय साजरा केला होता. आजही सायनाची सुरुवात आशादायक झाली. सायनाने ६-६ ने बरोबरी साधल्यानंतर सतत आघाडी मिळवीत पहिला गेम जिंकला. या गेममध्ये ब्रेकच्या वेळी सायनाकडे ११-६ अशी आघाडी होती. गुडघ्याला त्रास जाणवल्याने शुईरुई डगमगली. त्याचा लाभ घेत सायनाने गेम जिंकला. दुसरा गेम चढ-उताराचा राहिला. सायनाने ३-१ अशी आघाडी घेतली, पण शुईरुईने १०-१० अशी बरोबरी साधली. एक वेळ १८-१७ अशी चढाओढ चालली असताना चीनच्या खेळाडूने सलग तीन गुणांची कमाई करीत सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये सायनाकडे १२-७ अशी आघाडी झाली होती. पण शुईरुईने सलग पाच गुण घेत १२-१२ अशी बरोबरी केली. सायनाने १९-१८ अशी पुन्हा आघाडी मिळविली. पण शुईरुईने अखेरच्या क्षणी झुंजारवृत्तीचा परिचय देत गेम आणि सामना खेचून नेला.