हो चीमिन्ह : येथे आजपासून सुरू होत असलेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतून आघाडीच्या खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी भारतीय संघातून माघार घेतली आहे. या दोघींच्या अनुपस्थितीत भारताची भिस्त पुरुष एकेरी तसेच दुहेरीवर विसंबून असेल.आधी जाहीर झालेल्या भारतीय संघात सायना व सिंधू यांची नावे होती, पण व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे दोघींनीही माघार घेतली. सायना, सिंधू यांच्या अनुपस्थितीत तन्वी लाड आणि अलीकडे राष्ट्रीय चॅम्पियन बनलेली पोलिश ओपन विजेती रितूपर्णा दास या एकेरीत खेळणार आहेत. पुरुष एकेरीची जबाबदारी एच. एस. प्रणव आणि सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स विजेता समीर वर्मा यांच्या खांद्यावर असेल. प्रणव म्हणाला, ‘सायना, सिंधूच्या अनुपस्थितीमुळे कामगिरीवर परिणाम होणार असला तरी यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळेल. मी स्वत: चांगला सराव करीत आहे, पण सामने सुरू होतील तेव्हा खरा कस लागेल.’ स्पर्धेत दुहेरीचे तीन सामने खेळले जातील. प्रणव-एन. सिक्की रेड्डी, सुमन रेड्डी-मनू अत्री ही पुरुष जोडी तसेच अश्विनी पोनप्पा तसेच सिक्की रेड्डी या जोडींकडून मोठ्या आशा आहेत. (वृत्तसंस्था)भारताचा समावेश कोरिया आणि सिंगापूरसोबत ड गटात करण्यात आला आहे. स्पर्धेत चीन, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड या दिग्गज संघांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
सायना, सिंधू यांची ‘आशियाई’तून माघार
By admin | Published: February 14, 2017 12:15 AM