सिडनी : आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकणारा किदाम्बी श्रीकांतसह, गतविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारत विजयी सलामी दिली. मात्र, दुसरीकडे इंडोनेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठलेला एचएस प्रणॉय, अजय जयराम आणि पारुपल्ली कश्यप या खेळाडूंना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या श्रीकांतने सलामीला चीनी तैपईच्या कान चाओ यू याचा २१-१३, २१-१६ असा धुव्वा उडवून दिमाखात विजय मिळवला. त्याचवेळी, अन्य सामन्यात बी. साई प्रणीत याला विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. इंडोनेशियाच्या टोमी सुगियार्तोविरुद्ध रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रणीतने पहिला गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत १०-२१, २१-१२, २१-१० असा शानदार विजय मिळवला. महिला गटात भारताच्या दोन्ही प्रमुख खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली. पी. व्हि. सिंधूला पहिल्या लढतीत तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. इंडोनेशिया स्पर्धा जिंकलेल्या जपानच्या सयाका सातो हिचे कडवे आव्हान सिंधूने २१-१७, १४-२१, २१-१८ असे परतावले. त्याचवेळी, रुत्विका शिवानी गड्डे हिला मात्र पहिल्याच सामन्यात चीनच्या चेन झियोझीनविरुध्द १७-२१, २१-१२, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. सिंधू दुसऱ्या फेरीत चेनविरुद्ध लढेल. अन्य एका लढतीत सायना नेहवालने कोरियाच्या चौथ्या मानांकीत सुंग जी ह्यून हिच तगडे आव्हान सरळ दोन गेममध्ये परतावले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या सायनाने ह्यूनला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता २१-१०, २१-१६ असा शानदार विजय मिळवला.यांनी केली निराशा...एचएस प्रणॉय, अजय जयराम आणि पारुपल्ली कश्यप या अनुभवी खेळाडूंना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला. जयरामला हाँगकाँगच्या सातव्या मानांकीत एनजी का लाँग एंग्ज विरुद्ध १४-२१, २१-१०, २१-९ असा पराभव पत्करावा लागला. तसेच, झुंजार खेळाचे प्रदर्शन केल्यानंतरही कश्यप सोन वानविरुध्द २१-१८, १४-२१, २१-१५ असा पराभूत झाला. इंग्लंडच्या राजीव ओसेफ याने प्रणॉयचे आव्हान २१-१९, २१-१३ असे संपुष्टात आणले.
सायना, सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी
By admin | Published: June 22, 2017 1:14 AM