टोकियो : जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली भारताची सायना नेहवाल, तिसरा मानांकित किदांबी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांनी बुधवारी जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे अजय जयराम, पीव्ही सिंधू यांच्यासह ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या जोडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मंगळवारी २९ वा वाढदिवस साजरा करणारा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता कश्यपने पहिल्या फेरीत स्थानिक खेळाडू ताकुम उयेदाविरुद्ध विजयी ठरला. पहिल्या गेममध्ये ३-२ असा गुणफलक असताना स्थानिक खेळाडू सामन्यातून माघारताच कश्यपने पुढील फेरी गाठली. नंबर वन असलेली सायनाने दोन लाख ७५ हजार डॉलरचे रोख पारितोषिक असलेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपानला ४२ मिनिटात २१-१४, २२-२० गुणांनी नमविले. पहिली गेम सहज जिंकणाऱ्या सायनाला दुसऱ्या गेममध्ये मात्र झगडावे लागले. दुसऱ्या फेरीत सायनाला जपानच्या मिनात्सु मितानीविरुद्ध लढावे लागणार आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा कास्य जिंकणाऱ्या सिंधूला महिला एकेरीत जपानची मिनात्सू मितानी हिचे आव्हान परतविणे अवघड झाल्याने ती १३-२१, २१-१७, ११-२१ अशा फरकाने पराभूत झाली. हॉलंड ओपन चॅम्पियन अजयलादेखील पहिल्या फेरीत डेन्मार्कचा सातवा मानांकित व्हिक्टर एक्सेलसेन याने २१-१०, २१-१० ने नमविले. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेची रौप्यविजेती जोडी ज्वाला-आश्विनी यांना चीनची जोडी झाओ आणि झोंग यांच्याकडून ५४ मिनिटांत २०-२२, २१-१८, १३-२१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रज्ञा गद्रे आणि एन. सिक्की रेड्डी या महिला दुहेरी जोडीला पहिल्या फेरीत मिसाकी मातसुतोमो आणि अयाका ताकाहाशी या जपानच्या अव्वल जोडीने ६-२१, १७-२१ अशा फरकाने नमविले.(वृत्तसंस्था)
सायना, श्रीकांत, प्रणव दुसऱ्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2015 1:22 AM