क्वालालंपूर : इंडिया ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या मलेशिया ओपन सुपर सिरीज प्रिमियर बॅडमिंटन स्पर्धेद्वारे आपला शानदार फॉर्म कायम ठेवताना विजयी मालिका कायम ठेवण्याच्या वज्र निर्धाराने खेळतील.सायना आणि श्रीकांतला इंडिया ओपनमध्ये मिळवलेल्या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्याची उसंतही मिळाली नाही आणि रविवारी रात्रीच त्यांना मलेशियाला रवाना व्हावे लागले. हे दोन्ही खेळाडू बुधवारपासून मुख्य ड्रॉमधील आपल्या अभियानास सुरुवात करतील.औपचारिकपणे गुरुवारीच जागतिक क्रमवारीत नंबर वन ठरलेल्या सायनाला पहिल्या फेरीत तृतीय मानांकित इंडोनेशियाच्या मारिया फेबे याच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे. दुसऱ्या फेरीत थायलंडच्या १९ व्या मानांकित बुसाननच्या ओंगबुरंगपनविरुद्ध तिची लढत होऊ शकते. उपांत्यपूर्व फेरीत सायना चीन तैपेईच्या सातव्या मानांकित तेई जू यिंग हिच्याविरुद्ध खेळू शकते. येथे तिचा विजेतेपदाचा मार्ग मात्र खडतर आहे. कारण चीनची अव्वल मानांकित खेळाडू शुरुई आणि वांग यिहान या स्पर्धेत खेळत आहेत.सायना म्हणाली, ‘‘मी गेल्या तीन महिन्यांपासून तीन फायनल्समध्ये पोहोचली आहे आणि त्याचे महत्त्व मी शिकत आहे. मी सर्वच स्पर्धा गांभीर्याने घेत आहे. प्रत्येक स्पर्धा कठीण असून त्यासाठी मी तयारीनिशी उतरेल.’’दुसरीकडे श्रीकांतला पहिल्या फेरीत २०१० च्या राष्ट्रकुलमधील रौप्यपदक जिंकणाऱ्या इंग्लंडच्या राजीव ओसेफविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत. गतवर्षी आॅगस्टमध्ये श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत राजीवला धूळ चारली होती.पहिल्या फेरीतील लढत जिंकल्यास श्रीकांतची लढत जागतिक क्रमवारीतील १६ व्या मानांकित चीनच्या तियान हुवेई याच्याविरुद्ध होऊ शकते. याविषयी श्रीकांत म्हणाला, ‘‘प्रत्येक विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक विजयामुळे मला प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळतो.’’ (वृत्तसंस्था)
सायना, श्रीकांतचे टार्गेट आता मलेशियन विजेतेपदावर
By admin | Published: March 30, 2015 11:50 PM