नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने यंदाच्या वर्षात पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर कब्जा करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, गेल्यावर्षीप्रमाणे तिची कामगिरी यंदाही चांगली झाली, पण भारताच्या इतर खेळाडूंना फारसे पराक्रम गाजवता आले नाहीत. नाही म्हणता के. श्रीकांतची दोन विजेतीपदे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. पण पी. व्ही. सिंधू, पी. कश्यप आणि अजय जयराम हे दुखापतींशी झगडत राहीले. एकंदरीतच भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी हे वर्ष २०१४च्या तुलनेत सरासरी यश देणारे ठरले. सुपरस्टार सायना नेहवालने भारतातील प्रतिष्ठित सय्यद मोदी ग्रा. प्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर इंडियन ओपन सुपर सिरीजची विजेती बनली. या विजेतेपदामुळे तिला आंतरराष्ट्रीय मानांकनात सिंहासनावर बसण्याचा बहुमान मिळाला. तिच्यासाठी आणि देशासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट ठरली. आॅलिम्पिक कांस्यविजेती सायनाने यंदा आॅल इंग्लंड स्पर्धा आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपची अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. नोव्हेंबरमध्ये सायनाला दुखापत झाल्यामुळे हाँगकाँग ओपनमधून तिने माघार घेतली. वर्षाच्या शेवटच्या बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज फायनलमध्ये तिने शानदार पुनरागमन करीत वर्ल्ड नंबर वन खेळाडू कॅरोलिना मारीनला हरविले. परंतु तिच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले, त्यामुळे ती सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकली नाही. खांद्याच्या दुखापतीशी झुंजणारा अजय जयराम मलेशिया मास्टर्स, स्विस ओपन आणि रशियन ओपनच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. एस. एस. प्रणय आपल्या सर्वोत्कृष्ट बाराव्या रँकिंगपर्यंत पोहचू शकला, परंतु तो कोणतेही विजेतेपद मिळवू शकला नाही. पुरुष दुहेरीत मनू अत्री रेड्डी आणि बी सुमित रेड्डी यांंच्यासाठी हे वर्ष थोडे चांगले ठरले. महिला दुहेरीची हिट जोडी ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोणप्पा यांनी कॅनडा ओपनचे विजेतेपद तसेच युएस ओपनचे उपविजेतपद मिळविले.राष्ट्रकूल चॅम्पियन पी. कश्यपने सय्यद मोदी स्पर्धा जिंकून वर्षाचा शुभारंभ चांगला केला. जूनमध्ये त्याने इंडोनेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता, तर सिंगापूर ओपनमध्ये त्याने फायनल गाठली होती. फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या दुखापतीमुळे कश्यप उर्वरीत सत्रात खेळू शकला नाही.पाच वर्षांपूर्वी खेलरत्न आणि पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या सायना नेहवालने पद्मभूषण पुरस्कारासाठी आपले नाव न पाठविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तिच्या ट्विटनंतर क्रीडा मंत्रालयाने तिच्या नावाची शिफारस केली, परंतु गृहमंत्रालयाकडून तिच्या पुरस्कारावर शिक्कामोर्तब झाला नाही.गेल्यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीपसह पाच पदके जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तिची वर्षभराची कामगिरी प्रभावित झाली. दुखापतीतून सावरल्यानंतर सिंधूने आॅक्टोबर महिन्यात डेन्मार्क सुपरसिरीज फायनलमध्ये स्थान मिळविले. मकाऊ ओपनमधील तिची विजेतेपदाची हॅट्ट्रीक हेच एकमेव तिचे यश ठरले. पुरुष गटात किदाम्बी श्रीकांतने चायना ओपनमध्ये दोन वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन लिन डॅनला हरवून विजेतेपदाचा ताज परिधान केला. त्याने सत्राच्या पहिल्या टप्प्यात स्विस ओपन आणि इंडिया ओपन जिंकून जूनच्या मानांकन यादीत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. वर्षाच्या उत्तरार्धात मात्र त्याच्या कामगिरीत पडझड झाली. बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज फायनल्समध्ये तो एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला होता.
सायना ‘वेल’, बाकी फेल
By admin | Published: December 18, 2015 3:10 AM