नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिचा जागतिक क्रमवारीतील नंबर वनविषयी ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, आता ती तिसऱ्यांदा पुन्हा जगातील नंबर वनची खेळाडू बनली आहे.सायना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेआधी नंबर एक पोजिशनवर पोहोचली आहे. यावर्षी मार्च महिन्यात इंडियन ओपनदरम्यान ती नंबर वन खेळाडू बनली होती. त्यानंतर चीनची ली जुईरुई हिने अव्वल स्थान मिळवले होते; परंतु सिंगापूर ओपनमध्ये जुईरुई न खेळल्यामुळे सायनाला त्या वेळेस कोणत्याही स्पर्धेत न खेळता नंबर वन रँकिंग मिळाले होते. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत सायनाने पुन्हा ही रँकिंग गमावले होते; परंतु ती आता पुन्हा ८२३४२ गुणांसह जगातील नंबर वन खेळाडू बनली आहे. सायनाला आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसरे मानांकन मिळाले आहे. जुईरुई (८0७६४) हिची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.स्पेनची कॅरोलिना मारिन (७९३५२) तिसऱ्या स्थानावर कायम आहे. भारताची पी. व्ही. सिंधूची एका क्रमांकाने घसरण झाली असून, ती १२ व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत त्याच्या चौथ्या, पारुपल्ली कश्यप १३ व्या आणि एच.एस. प्रणय १५ व्या स्थानावर कायम आहे.महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाची एका स्थानाने प्रगती झाली असून, त्या २१ व्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या रँकिंगमध्ये टॉप २५ मध्ये एकाही भारतीय जोडीचा समावेश नाही.
तिसऱ्यांदा ‘नंबर वन’ बनली सायना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2015 12:50 AM