दुबई : भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालने बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारिनाचा चुरशीच्या झालेल्या लढतीत २-१ गेमने पराभव करून आॅल इंग्लंड व वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. दुसरीकडे किदांबी श्रीकांतला पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्या पराभवानंतर या स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.महिलांच्या एकेरीत सायनाने जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या कॅरोलिनाला २३-२१, ९-२१, २१-१२ असे पराभूत केले. श्रीकांतने या वर्षी स्वीस ओपन आणि इंडियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेदरम्यान व्हिक्टरला दोनदा पराभूत करणारा श्रीकांत आज मात्र पूर्णपणे भरात नव्हता आणि त्याला ३७ मिनिटांत १३-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. गुंटूरच्या या २२ वर्षीय खेळाडूला अखेरच्या साखळी लढतीत चिनी-तैपेईच्या चाऊ टीएनशी खेळावे लागेल. जागतिक क्रमवारीत सहाव्या मानांकित व्हिक्टरने या सामन्यात चांगली सुरुवात करताना लवकरच ६-३ अशी आघाडी घेतली; परंतु श्रीकांतने मुसंडी मारताना बरोबरी साधली व एक वेळ तो व्हिक्टरच्या ११-१० असा पुढे होता. तथापि, व्हिक्टरने श्रीकांतने केलेल्या चुकीचा फायदा उठवताना व शानदार फटके मारून १६-११ व हा गेम २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये व्हिक्टरने ११-५ अशी आघाडी घेतली; परंतु श्रीकांतने पुनरागमन करून १५-१९ पर्यंत मजल मारली; परंतु व्हिक्टरने क्रॉसकोर्ट स्मॅश मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.
सायनाने कॅरोलिनाचा वचपा काढला
By admin | Published: December 11, 2015 12:29 AM