सिडनी : रिओ आॅलिम्पिकपूर्वी आपले नाणे खणखणीत वाजवताना भारताची फुलराणी सायना नेहवालने आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे शानदार विजेतेपद पटकावले. चीनच्या सुन यू हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पिछाडीवरून नमवताना सायनाने दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या सुन यू हिने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये २१-११ अशी बाजी मारुन सायनावर दडपण आणले. मात्र, यानंतर झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सायनाने आपला सर्व अनुभव पणास लावताना सलग दोन गेम जिंकत सुन यूला ११-२१, २१-१४, २१-१९ असे नमवले. याआधी सायनाने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रेचानोक इंतानोन आणि उपांत्य सामन्यात २०११ व २०१३ साली जागतिक विजेती ठरलेल्या चीनच्या यिहान वांगला पराभूत केले होते. विशेष म्हणजे, हे विजेतेपद यंदाच्या मोसमात सायनाचे पहिले विजेतेपद ठरले. याआधी २०१४ साली या स्पर्धेत बाजी मारलेल्या सायनाला तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपदासाठी थांबावे लागले. गतवर्षी दिल्लीला झालेल्या इंडिया सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावल्यानंतर आॅस्टे्रलियन ओपन विजेतेपद सायनाने पटकावलेले पहिले विजेतेपद ठरले. याआधी झालेल्या पाचही लढतीत सुन विरुद्ध सायनाने बाजी मारली आहे. मात्र, यावेळी तिला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. पहिला गेम केवळ १८ मिनिटांत जिंकल्यानंतर सुनचा सायनाविरुद्ध निभाव लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये सावध पवित्रा घेतल्यानंतर ४-४ अशी बरोबरी राहिली. यानंतर सुनने आघाडी घेतल्यानंतर सायनाने १०-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सायनाने आक्रमक खेळाच्या जोरावर १७-१२ असे वर्चस्व राखत दुसरा गेम जिंकून सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला.निर्णायक गेममध्ये दोघीनींही सावध खेळ करताना अतिरिक्त धोका टाळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या आघाडीनंतरही सुनने बरोबरी साधल्यानंतर सायनाने नियंत्रण गमावले नाही हे विशेष. यानंतर सायनाने मोठ्या रॅलीजला संयमी उत्तर देताना २०-१७ अशा आघाडीचे विजयात रूपांतर करून विजेतेपद उंचावले. (वृत्तसंस्था)>मोदींनी केले अभिनंदन..रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाचे मोठे आशास्थान असलेल्या सायना नेहवालचे आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरद्वारे सायनाचे अभिनंदन करताना म्हटले की, ‘‘या शानदार विजेतेपदासाठी सायनाचे खूप खूप अभिनंदन. तुझ्या या विजेतेपदाचा देशाला गर्व आहे.’’ त्याचवेळी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि रिओ आॅलिम्पिकसाठी भारतीय संघाचा सदिच्छा दूत असलेल्या सचिन तेंडुलकरनेही सायनाचे अभिनंदन करताना सांगितले, ‘‘हा क्षण पूर्ण देशासाठी एक गर्वाची बाब आहे. सायनाने दुसऱ्यांदा आॅस्टे्रलिया ओपन जिंकले असून तिला रिओ आॅलिम्पिकमसाठी खूप शुभेच्छा.’’ >१० लाखांचा पुरस्कार...आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवालला भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सायनाच्या या शानदार विजेतेपदानंतर ‘बाई’चे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘या शानदार विजयासाठी मी सायनाचे अभिनंदन करतो. तिच्या कारकिर्दीमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा विजय तिला रिओ आॅलिम्पिकसाठी प्रेरित करेल. आॅलिम्पिकमध्ये ती भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्त्व करेल. त्याचबरोबर मी तिचे कोच विमल कुमार आणि सहयोगी स्टाफचेही अभिनंदन करतो.’’
सायनाने आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावले
By admin | Published: June 13, 2016 6:08 AM