नवी दिल्ली - भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय क्रीडा प्राधिकरणाराला (साई) देण्यात येणा-या वार्षिक अनुदानात काही कपात झालेली नाही. या प्रक्रियेत केवळ बदल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले आहे.राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात माहिती देताना राठोड यांनी २०१८-१९ साठी सादर करण्यात आलेल्या क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २५८.२ कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली असून ही रक्कम २१९६.३६ कोटी इतकी असेल. तथापि, साईच्या बजेटमध्ये४९५.७३ कोटीवरुन ६६.१७ कोटी रुपयांची कपात करीत ४२९.५६ कोटी तितकीच रक्कम करण्यात आल्याचे सांगितले.साईच्या अनुदानात कुठलीही कपात केली नसल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले,‘मंत्रालयाच्या खेलो इंडिया योजनेशी संबंधित अनेक कामे साईकडे सोपविण्यात आली आहेत. या योजनांचा अंमलबजावणी फंड साईला मिळेल. यादृष्टीने साईच्या अनुदानात कपात झालेली नाही. मंत्रालय आणि साई यांच्यात पायाभूत सुविधांची जुळवाजुळव करण्यासाठी समन्वय राखण्यात आला आहे.’(वृत्तसंस्था)
साईच्या बजेटमध्ये कपात नव्हे, बदल केला - क्रीडामंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:17 AM