नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर्सनी चेक प्रजासत्ताकमध्ये आयोजित ४८ व्या ग्रांप्रि उस्ती नाद लाबेम चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करताना पाच सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावले.विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता शिव थापा (६० किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६९ किलो), अमित फंगल (५२किलो), गौरव विधुडी (५६ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक) यांनी शनिवारी आपापल्या गटात अंतिम लढतींमध्येविजय मिळवित सुवर्णपदकांची कमाई केली.कविंदर बिष्ट (५२ किलो) आणि मनीष पवार (८१ किलो) यांना रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत पराभूत झालेला सुमीत सांगवान कांस्य पदकाचा मानकरी ठरला.अमित व कविंदर यांच्यादरम्यान अंतिम लढत झाली. त्यात अमित लाइट फ्लायवेट (४९ किलो) गटात खेळतो, पण या स्पर्धेत तो फ्लायवेट गटात खेळला. त्याने कविंदरचा ३-२ ने पराभव केला. त्यानंतर गौरवने पोलंडच्या इवानाऊ जारोस्लाव्हचा ५-० ने सहज पराभव केला.अलीकडेच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावणाºया थापाने स्लोव्हाकियाच्या फिलीप मेसजारोसविरुद्ध सुरुवातीपासून वर्चस्व गाजवताना ५-० ने विजय मिळवला. या विजयामुळे थापाचे हॅम्बर्ग (जर्मनी) येथे पुढील महिन्यात खेळल्या जाणाºया विश्व चॅम्पियनशिपपूर्वी मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल.हॅम्बर्ग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी करीत असलेला अन्य बॉक्सर मनोजने स्थानिक बॉक्सर डेव्हिड कोटरचचा ५-० ने पराभव केला. सतीश कुमारला सुवर्णपदक मिळवताना जर्मनीच्या मॅक्स केलरविरुद्ध घाम गाळावा लागला.मनीषला जर्मनीच्या इब्रागिम बाजुएव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेसह भारतीय बॉक्सर्सचा २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित विश्व चॅम्पियशिपपूर्वीचे १५ दिवसांचे सराव शिबिर व स्पर्धा दौरा संपला.या स्पर्धेत सहभागी झालेले बॉक्सर्स अमित, कविंदर, गौरव, शिव थापा, मनोज, सुमीत आणि सतीश विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत आहेत. या व्यतिरिक्त विकास कृष्ण (७५ किलो) विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत आहे, पण त्याने या दौºयावर जाण्यापेक्षा पुणे येथे सराव करण्यास पसंती दिली. (वृत्तसंस्था)
शिव, मनोज, अमित गौरव यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:30 AM