बुडापेस्ट : तीनवेळचा जागतिक ज्युनिअर जागतिक स्पर्धेमधील पदकविजेता साजन भानवालला (ग्रीको रोमन, ७७ किलो) यूडब्ल्यूडब्ल्यू २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदकाच्या लढतीत रविवारी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, रवीला (९७ किलो) रेपेचेज फेरीत पदक जिंकण्याची संधी राहील. तुर्कीच्या सेरकान अक्कोयुन याने कांस्य पदक ाच्या लढतीत भानवालवर वर्चस्व गाजवले. त्याने एकतर्फी सामन्यांत १०-१ ने विजय मिळवला.
रवीचा उप-उपांत्यपूर्व फेरीत जॉर्जियाच्या ग्रेपियर जियोर्गी मेलियाविरुद्ध ८-० ने पराभव झाला, पण त्यानंतर त्याने अंतिम फेरी गाठल्याने रवीला पदक जिंकण्याची संधी मिळाली. रवी कांस्यपदक प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्यापासून एक विजय दूर आहे. अन्य सामन्यांत ग्रीको रोमनच्या रेपेचेज फेरीत अर्जुन हालाकुरकीला (५५) अर्मेनियाच्या नोराय हाखोयानविरुद्ध २-१० ने पराभव स्वीकारावा लागला.पुरुषांच्या ८७ किलो गटात सुनील कुमारने रेपेचेजच्या पहिल्या लढतीत स्वीडनच्या अलेक्झँडर स्टेपानेटिकचा ५-३ ने पराभव करीत पदकाच्या आशा पल्लवीत केल्या, पण दुसऱ्या लढतीत त्याला क्रोएशियाच्या इवान हुक्लेकविरुद्ध ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला. सचिन राणा (६०) याला चीनच्या लिगुओ काओने गाशा गुंडाळण्यास भाग पाडले, तर राहुलला रशियाच्या मागोमेड यारबिलोव्हविरुद्ध ७२ किलो वजन गटात पराभव पत्करावा लागला.नीरजचा (८२) सर्बियाच्या कोवासेविचविरुद्ध १०-१ ने पराभव झाला. उप-उपांत्यपूर्व फेरीपासून सुरुवात करणाºया रवींद्रला (६७) तुर्कीच्या हाकी काराकुसने नमविले.