Sakshi Malik : नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास भाजप नेत्या बबिता फोगटने खेळाडूंना प्रवृत्त केले होते, असा दावा ऑलिम्पिक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे. तसेच, बबिता फोगटला ब्रिजभूषण शरण सिंह यांची जागा घ्यायची होती आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष व्हायचे होते, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे.
साक्षी मलिकने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बबिता फोगटवर आरोप केले आहेत. यावेळी साक्षी मलिक म्हणाली, बबिता फोगटने अनेक कुस्तीपटूंसोबत बैठकीची व्यवस्था केली होती. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघामध्ये सुरू असलेल्या कथित अनियमिततेविरोधात निदर्शने व्हावीत, अशी कुस्तीपटूंना तिने विनंती केली होती. बबिता फोगटचा स्वतःचा अजेंडा होता, त्यामुळे तिने आम्हाला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. तसेच, तिला स्वतः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते, असे साक्षी मलिकने सांगितले.
या आंदोलनासाठी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्याच्या अफवा आहेत. पण हे सर्व खोटे आहे. भाजपच्या दोन नेत्यांनीच आम्हाला हरयाणात आंदोलनाची परवानगी मिळवून दिली. त्यात बबिता फोगट आणि तीरथ राणा यांची नावे आहेत, असेही साक्षी मलिकने म्हणाली. दरम्यान, भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गेल्या वर्षी महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात चौकशीची मागणी करत महिला कुस्तीपटूंनी अनेक दिवस आंदोलन केले होते.
हे आंदोलन पूर्णपणे बबिता फोगटच्या सांगण्यावरून झाले नाही. तिच्या सल्ल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली, असे साक्षी मलिकने सांगितले. तसेच, आम्हाला भारतीय कुस्ती महासंघामध्ये लैंगिक छळ आणि विनयभंगाचीही माहिती होती. त्यामुळे मलाही वाटले की महासंघाची प्रमुख महिला खेळाडू असेल तर खूप बदल घडून येईल. आमचा संघर्ष तिला समजेल असा आम्हाला विश्वास होता. पण, बबिता फोगट आमच्यासोबत असा खेळ खेळेल हे आम्हाला माहीत नव्हते, असेही साक्षी मलिक म्हणाली.
याचबरोबर, या आंदोलनात बबिता फोगटही आमच्यासोबत बसून आवाज उठवेल, असे आम्हाला वाटले होते, असे साक्षी मलिक म्हणाली. तसेच, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल साक्षी मलिक म्हणाली की, ब्रिजभूषण शरण सिंह म्हणायचे की जे लोक त्यांच्याविरोधात आंदोलन करत होते ते संपले. मात्र, हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटला मिळालेल्या यशावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे दावे खोटे ठरल्याचे दिसून येते.