ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १८ - रिओ ऑलिम्पिकमध्ये बारा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. महिला कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात मल्ल साक्षी मलिकनं भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले.
महिला कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात झालेल्या लढतीत साक्षी मलिकनं किर्गिझस्तानच्या आयसूलू टिनिबेकोव्हावर ८-५ ने मात करत विजय मिळवला. साक्षी मलिक आणि आयसूलू टिनिबेकोव्हा यांच्यातील ही लढत चांगलीच रंगतदार ठरली. रेपेचेजमध्ये संधी मिळताच साक्षीने ५८ किलो गटात कांस्य पदकाच्या निर्णायक कुस्तीत पहिल्या तीन मिनिटांत ०-५ ने माघारल्यानंतरही अखेरच्या तीन मिनिटांत तब्बल आठ गुणांची कमाई करीत कांस्यपदकावर नाव कोरले.
पराभूत आयसूलू टिनिबेकोव्हा हिने रेफ्रल मागितले पण रेफ्रलचा निर्णय देखील भारताच्या बाजूने जाताच साक्षीला आणखी एक गुण मिळाला. साक्षीने तिरंगा उंचावित प्रशिक्षकासह विजयाचा आनंद साजरा केला. पहिल्या पदकाचा आनंद भारतीय चाहत्यांनी देखील टाळ्यांच्या गजर करीत साक्षीच्या कर्तृत्वाला दाद दिली.
कर्नम मल्लेश्वरी (वेटलिफ्टिंग), मेरिकोम (बॉक्सिंग) आणि सायना नेहवाल (बॅडमिंटन) यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी चौथी महिला खेळाडू ठरली. भारताची रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची प्रतिक्षा १२ व्या दिवशी संपली. हरियाणाच्या रोहतकची मल्ल असलेल्या साक्षीने आश्चर्यकारक ‘कमबॅक’ करीत सनसनाटी विजयाची नोंद केली. कुस्तीत देशासाठी पदक जिंकणारी साक्षी पहिलीच महिला मल्ल बनली आहे.
साक्षीनं कांस्य पदक जिंकल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, तिची आई सुदेश मलिक हिने सुद्धा माझ्या मुलीनं ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून दिल्याने भारताचा पदकाचा दुष्काळ संपला. मला तिचा अभिमान आहे, असे म्हटले आहे.
India's daughter has stopped India's medal drought. So proud of her: Sudesh Malik, #SakshiMalik's mother pic.twitter.com/F5YPKwjKnu— ANI (@ANI_news) August 17, 2016