अनाहिम (अमेरिका) : जखमेतून सावरलेला समीर वर्मा आणि एच. एस. प्रणय बुधवारपासून सुरू होत असलेल्या यूएस ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय आव्हान सादर करण्यास सज्ज आहेत. यंदा सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड स्पर्धेचा विजेता समीर खांद्याच्या दुखापतीमुळे मागच्या महिन्यात इंडोनेशिया, तसेच आॅस्ट्रेलिया सुपर सिरिजमध्ये खेळू शकला नव्हता. याशिवाय ‘व्हिसा’ वेळेवर न मिळाल्याने त्याला कॅनडा ओपनपासूनही वंचित व्हावे लागले. २२ वर्षांचा समीर यूएस ओपनमध्ये ही उणीव भरून काढू इच्छितो. या स्पर्धेत त्याची सलामीला गाठ पडेल ती व्हिएतनामचा हुआंग नाम नगूएन याच्याविरुद्ध.प्रणय आणि पारुपल्ली कश्यप हे कॅनडा ओपनमधून लवकर बाहेर पडल्यानंतर येथे मात्र चांगल्या निकालाची अपेक्षा बाळगून खेळणार आहेत. एकेरीत खेळणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये अभिषेक येलेगर आणि सारंग लखानी यांचा समावेश आहे. महिला एकेरीतून सायना नेहवालने माघार घेतल्यानंतर राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दास आणि ऋत्विका गाडे या भारतीय आव्हान सादर करतील. याशिवाय श्रीकृष्णप्रिया कुदरावल्ली आणि रेश्मा कार्तिक यादेखील संघात आहेत. (वृत्तसंस्था)
समीर, प्रणव, कश्यप सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:05 AM