पणजी : हल्लीच महिला गटात राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या गोव्याच्या समिरा अब्राहमची निवड २०१८ पोखरा एनटीटी दक्षिण आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेसाठी झाली आहे. भारतीय ट्रायथलॉन संघटनेने समिराच्या निवडीचे पत्र गोवा ट्रायथलॉन संघटनेला पाठविले आहे. ती आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा आशियाई ट्रायथलॉन कन्फेडेरेशन यांनी पोखरा (नेपाळ) येथे २८ एप्रिल रोजी आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी भारताचे एकूण चार खेळाडू निवडण्यात आले. त्यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. गुजरातची राष्ट्रीय खेळाडू प्रगना मोहन, सर्व्हिसेस स्पोटर््स कंट्रोल बोर्डचे एस. बिश्वरजित सिंग आणि केएसएच मिनाचंद्रा यांचा समावेश आहे. भारतीय संघाला दोन्ही गटांत पदक जिंकण्याची संधी आहे.
दरम्यान, विशाखापट्टणम येथे ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्पर्धेत समिरा हिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंद असा सर्वसाधारण वेळ देत चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. तिने १.५ किमी स्विमिंगसाठी २७.४५ मिनिटे वेळ, ४० किमी सायकलिंगसाठी १ तास १० मिनिटे आणि १६ सेकंदांची वेळ, तर १० किमी धावण्याची शर्यत ५१.०५ अशा वेळेत पूर्ण केली होती.