दुबई : विंडीजचा अष्टपैलू मर्लोन सॅम्युअल्स याच्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिस्बेनमध्ये त्याच्या गोलंदाजी शैलीच्या चाचणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. विंडीज व श्रीलंका संघांदरम्यान ४ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ३४ वर्षीय सॅम्युअल्सच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. सामना अधिकाऱ्यांनी सॅम्युअल्सच्या सदोष गोलंदाजी शैलीचा अहवाल आयसीसीकडे सोपविला. आयसीसीने नियमानुसार ब्रिस्बेनमध्ये आयसीसीच्या मान्यताप्राप्त चाचणी केंद्रात त्याच्या शैलीची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. गोलंदाजी करताना त्याचे कोपर निर्धारित १५ अंशांपेक्षा अधिक वाकत असल्याचे निदर्शनास आले. सॅम्युअल्सला यापूर्वी डिसेंबर २०१३मध्ये वेगवान गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले होते. दोन वर्षांत दुसऱ्यांदा तक्रार करण्यात आल्यानंतर आणि स्वतंत्र चौकशीमध्ये शैली सदोष आढळल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभर गोलंदाजी करता येणार नाही. (वृत्तसंस्था)
सॅम्युअल्सच्या गोलंदाजीवर वर्षभराची बंदी
By admin | Published: December 15, 2015 1:35 AM