Sangeeta Phogat Wins Bronze : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या संगीता फोगाटने विदेशात मोठ्या स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारताची महिला कुस्तीपटू संगीता फोगाट हिने हंगेरीत बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड रँकिंग सिरीज स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. तिने तिसऱ्या-चौथ्या स्थानाच्या लढतीत हंगेरीच्या व्हिक्टोरिया बोर्सोसचा ५९ किलो वजनी गटात पराभव करून कांस्यपदक पटकावले. खरं तर संगीता फोगाटचा त्या पैलवानामध्ये समावेश होता ज्यांनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले होते.
सुरूवातीला भारतीय कुस्तीपटूचा पराभव झाला पण दुसऱ्या सामन्यात तिने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला. परंतु हंगेरीची कुस्तीपटू व्हिक्टोरिया बोरसोसविरुद्ध कांस्य पदकासाठीच्या लढतीत संगीताने बाजी मारली. लक्षणीय बाब म्हणजे मागील वर्षी संगीताने ६२ किलो वजनी गटात नॅशनल चॅम्पियनशिमध्ये विजय मिळवला होता.
आखाड्याबाहेरील कुस्ती अन् आता विदेशात डंकाऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाची पत्नी आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती गीता फोगाटची बहीण संगीता हिने अमेरिकेच्या जेनिफर पेज रॉजर्सकडून धक्कादायक पराभव करून आपल्या अभियानाची सुरुवात केली होती. पण रेपेचेज फेरीद्वारे तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. संगीताने तिसऱ्या फेरीतील विजयासह उपांत्य फेरीत स्थान मिळवले, मात्र तिला अंतिम फेरीत जागा मिळवता आली नाही.
पदक जिंकताच संगीता भावुक पदक जिंकल्यानंतर संगीता फोगाटने एक भावनिक ट्विट केले. "तुम्ही सर्वांनी केलेल्या अभिनंदनाचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, मी या क्षणी खूप भावुक झाली आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हे पदक फक्त माझे नाही तर तुम्हा सर्वांची ही पदके आहेत. मी हे पदक महिलांवरील गुन्ह्यांविरुद्ध लढणाऱ्या जगातील सर्व लढणाऱ्या महिलांना समर्पित करत आहे", असे संगीताने फोगाटने म्हटले.