मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या विद्यमाने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमारी गटात संघर्ष स्पोर्ट्स क्लब, राजमुद्रा क्रीडा मंडळ यांनी तिसरी फेरी गाठली. नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमारी गटात संघर्ष स्पोर्ट्स क्लबने प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा ३२-११ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. कोमल यादव, पूजा विनेरकर यांनी सुरवातीपासून चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत मध्यांतराला १५-०५ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. मध्यांतारानंतर आक्रमणाची धार आणखी वाढवीत विजय निश्चित केला. प्रबोधन स्पोर्ट्स कडून रोशनी मसुरकर एकाकी लढली. दुसऱ्या सामन्यात राजमुद्रा क्रीडा मंडळाने आकाश स्पोर्ट्स क्लबला २३-२२ असे चकवित आगेकूच केली. मध्यांतराला दोन्ही संघ १५-१५ असे बरोबरीत होते. मध्यंतरानंतर राजमुद्राच्या ललिता जाधव, संचिता सोनावणे यांनी शांत आणि संयमी खेळ करीत १ गुणांनी संघाचा विजय साकारला. आकाशकडून तनिशा भद्रीके, आदिती शिगवण यांनी शेवटपर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात त्यांना अपयश आले.
कुमार गटाच्या पहिल्या फेरीत श्री सिद्धिविनायक मंडळाने साईधाम सेवा मंडळाचा ४१-१७असा धुव्वा उडविला. विजयी संघाने मध्यांतारालाच २९-०७ अशी भक्कम आघाडी घेतली होती. ओमकार मोटे, रोशन पवार या विजयाचे शिल्पकार ठरले. साईधामचा नवनाथ सणगर चमकला. सत्यम सेवा मंडळाने पार्ले स्पोर्ट्सचा ४०-१३ असा पाडाव केला. यश डांगे, ऋषी यादव सत्यम कडून उत्कृष्ट खेळले. पार्लेचा निखिल पिसाळ चमकला. याच गटात शिंब्रादेवी सेवा मंडळाने चुरशीच्या लढतीत प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा २०-१४असा पराभव करीत आगेकच केली. मध्यांतराला ६-८अशा पिछाडीवर पडलेल्या शिंब्रादेवीच्या मनीष लाड, ओमकार लाड यांनी उत्तरार्धात जोशपूर्ण खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. प्रबोधनाच्या पवन पाटील, तेजस कदम यांच्या पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.
व्दितीय श्रेणी ( ब) गटात संघर्ष क्रीडा मंडळाने निर्धास्त मंडळावर १९-१२ अशी मात केली. अभिषेक बिराजदार, बॉबी केवट या विजयाचे शिल्पकार ठरले. संजय व आयुष या चव्हाण पिता-पुत्राचा खेळ निर्धास्त मंडळाचा पराभव टाळण्यास कमी पडला. आयुष हा गतवर्षी उपनगरच्या कुमार गटाच्या संघात होता. सन्मित्र मंडळाने उत्कर्ष मंडळाचा कडवा प्रतिकार १८-१६ असा मोडून काढला. मध्यांतराला दोन्ही संघ ८-८ असे समान गुणांवर होते. केतन सुतार, शेखर महामुलकर सन्मित्र कडून, तर साईराज कदम, स्वप्नील पाटील उत्कर्ष कडून उत्कृष्ट खेळले. लोकमान्य शिक्षण संस्थेने अझीझ शिक्षण संस्थेचा २७-१२ असा, गावदेवीने यंग साईचा २७-०६ असा ,तर स्वामी स्वामी समर्थने सक्षम मंडळाचा २९-०५असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.
छायाचित्र पुरुष :- निर्धास्त मंडळाच्या संजय कदमने संघर्ष मंडळाच्या खेळाडूची केलेली यशस्वीते पकड.