टोकियो : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व झेक गणराज्यची बार्बरा स्ट्राइकोव्हाने चीनच्या चेन लियांग व झाओयुआन यांग जोडीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून टोरे पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. रिओ आॅलिम्पिकनंतर पुन्हा एकत्र आलेल्या सानिया-बार्बरा जोडीने चीनच्या लियांग यांगला एकतर्फी झालेल्या लढतीत ५१ मिनिटांत ६-१, ६-१ गुणांनी पराभव केला. सानिया-बार्बरा जोडीचे आतापर्यंतचे हे तिसरे विजेतेपद आहे. सानिया-बार्बरा जोडीने गत महिन्यात सिनसिनाटी ओपन स्पर्धेत मार्टिना हिंगीस आणि कोको वॅँडेवेगे जोडीला पराभूत केले होते. सानिया-हिंगीस जोडीने तीन ग्रॅण्डस्लॅमसह एकूण १४ विजेतीपदे जिंकली आहेत; परंतु या दोघींनी आॅगस्ट महिन्यात महिला दुहेरीतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. महिला दुहेरीतील नंबर एक असलेल्या सानिया मिर्झाचे टोकिओमध्ये हे तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी सानियाने टोकिओमध्ये कारा ब्लॅकबरोबर दोन विजेतेपदे जिंकली आहेत. सानियाचे हे ४० वे जेतेपद आहे. (वृत्तसंस्था)
सानिया-बार्बराने जिंकले जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 5:24 AM