रिओ : सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भरवशाच्या भारतीय जोडीनेही आॅलिम्पिकमध्ये भारतीयांची निराशा केली. मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकासाठी झालेल्या प्ले आॅफ लढतीत ही जोडी रविवारी पराभूत झाली. याबरोबरच रिओ आॅलिम्पिकमध्ये टेनिस प्रकारात भारताचे अभियान पदकाविना संपले. सानिया-बोपण्णा जोडीला ल्युसी हराडेका आणि राडेक स्टेपानेक या झेक प्रजासत्ताकच्या जोडीने ६-१, ७-६ने नमवले. वास्तविक पाहता, मिश्र दुहेरीत सानिया-बोपण्णा यांना पदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. कारण, या प्रकारात केवळ १६ संघ सहभागी झाले होते. यामुळे ३ सामने जिंकल्यास पदक निश्चित होते. मात्र, भारतीय जोडीला हे जमले नाही. १ तास १३ मिनिटांच्या प्रतिकारानंतर त्यांनी गुडघे टेकले. सामन्याचा प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या सेटमध्ये काही कळायच्या आत झेक जोडीने ५-० अशी आघाडी घेतली. हा सेट सहजपणे गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने चांगला प्रतिकार केला. ५-५ अशी बरोबरी असताना सानियाने डबल फॉल्ट केला. यामुळे भारतीय जोडी निर्णायक क्षणी ३ ब्रेक पॉर्इंटने माघारली. यातच भर म्हणून बोपण्णाचा शॉट बेसलाईनच्या बाहेर गेला. ल्युसीने बॅकहॅण्डच्या अप्रतिम फटक्यांद्वारे २ मॅचपॉर्इंट वाचविल्यानंतर अखेरच्या क्षणी सानियाचा फोरहॅण्ड नेटमध्ये गेला आणि झेक जोडीचे पदक निश्चित झाले. (वृत्तसंस्था)
सानिया-बोपण्णा परतले पदकाविना
By admin | Published: August 15, 2016 5:52 AM