ब्रिस्बेन : भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड्स हिच्या साथीने ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीच्या रूपाने या सत्रातील आपले पहिले विजेतेपद पटकावले; परंतु नंबर वनची दुहेरीची रँकिंग मात्र तिने गमावली आहे. भारत आणि अमेरिकेच्या अव्वल मानांकित जोडीने अंतिम सामन्यात रशियाच्या एकाटेरिना मकारोव्हा आणि एलेना वेस्नीना या रशियन जोडीवर ६-२, ६-३ असा सरळ सेट्सने विजय मिळवला.या यशानंतरही सानिया तब्बल ९१ आठवड्यांतील डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू म्हणून राहण्याची मालिका मात्र खंडित झाली. आता नंबर वन स्थानावर बेथानीने कब्जा मिळविला आहे. सामन्यानंतर सानिया म्हणाली, ‘मला वाटते की, मिस वर्ल्डचा नंबर वनचा किताब मी सोपवत आहे.’’ सानिया या सामन्यात गत चॅम्पियनच्या रूपाने उतरली होती. तिने गेल्यावर्षी देखील या स्पर्धेत स्वीत्झर्लंडची महान खेळाडू मार्टिना हिंगीसच्या साथीने विजेतेपद पटकावले होते.विजयानंतर सानिया म्हणाली, वेस्नीना-मकारोव्हाविरुद्ध आमचे सामने नेहमीच चुरशीचे होतात. गत चॅम्पियन म्हणून येथे खेळणे शानदार आहे. माझी जोडीदार आणि सर्वांत चांगल्या मित्राला धन्यवाद. आम्हाला मोठा मार्ग पार करायचा आहे. आम्ही वर्षातून एकदा खेळतो. गेल्या वेळेस आम्ही बरोबर खेळलो तेव्हा सिडनीत विजेतेपद जिंकले होते. आम्ही जास्त काळासाठी सोबत खेळायला हवे असे मला वाटते. माझ्यासोबत खेळण्यासाठी धन्यवाद. मी जगातील नंबर वनची खेळाडू होती; परंतु आता जगातील नवी नंबर वन बनण्यासाठी तिचे अभिनंदन.’’ सानिया पुढील आठवड्यात सिडनीत आणि नंतर १६ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्राइकोव्हाच्या साथीने खेळेल.
सानियाला दुहेरीचे विजेतेपद
By admin | Published: January 08, 2017 3:49 AM