सिडनी इंटरनॅशनल टेनिस : सलग २९वा विजय, उपांत्य फेरीत रालुका-यारोस्लावावर मात
सिडनी : भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची स्टार टेनिसपटू मार्टिना हिंगीस यांनी आपला विजयी धडाका कायम राखताना सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. या जोडीचा हा सलग २९वा विजय ठरला. या विजयासह सानिया आणि हिंगीस यांनी सलग विजय मिळविण्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित सानिया आणि हिंगीस यांनी रुमानियाची रालुका ओलारू आणि कजाकिस्तानची यारोस्लावा श्वेडोव्हा या जोडीवर ३ सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ४-६, ६-३, १०-८ अशा फरकाने विजय मिळवून थाटात स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या विजयासह भारत आणि स्वित्झर्लंडच्या जोडीने १९९४मध्ये गिगी फर्नांडिस आणि नताशा जवेरा यांनी रचलेला सलग २८ विजयांचा विक्रम मागे टाकला. जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली सानिया आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेली हिंगीस वर्षातील आपल्या दुसऱ्या किताबापासून एक पाऊल दूर आहे. या दोन्ही खेळाडूंनी गत आठवड्यात ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना विजेतेपदाला गवसणी घातली होती. ही जोडी गतवर्षी एकत्र आली होती. यानंतर त्यांनी आतापर्यंत ९ किताब आपल्या नावे केले आहेत. त्यामध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांचा समावेश आहे. या जोडीने जर सिडनीत किताब आपल्या नावे केला, तर त्यांचे हे सलग सातवे जेतेपद असेल, तर एकूण ११ किताब त्यांच्या नावे होतील. तरीही मारली मुसंडीउपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया आणि हिंगीस यांना सामना आपल्या नावे करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. या जोडीने पहिला सेट ४-६ असा गमावला होता, तर दुसऱ्या सेटमध्ये ती १-२ ने पिछाडीवर होती. मात्र, यानंतर जोरदार मुसंडी मारून दुसरा सेट ६-३ ने जिंकला, तर तिसऱ्या सेटमध्ये १०-८ ने सरशी साधून सामन्यावर आपले नाव कोरले.