मेलबोर्न : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपली स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीससोबत शानदार प्रदर्शन केले आहे. हाच फॉर्म कायम राखत ही जोडी आता आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकाविण्याचा प्रयत्न करतील. तर, रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार फ्लोरिन मर्जिया यांच्या नजराही पहिल्या ग्रॅण्डस्लॅमकडे असतील. सानिया आणि हिंगीसने सलग ३० सामने जिंकत दबदबा निर्माण केला आहे. या दोघींनी गेल्या सत्रात अमेरिकन ओपन आणि विम्बल्डनचा किताब पटकाविला. या दोघींनी एका वर्षात ११ किताब जिंकले आहेत. ब्रिस्बेन आणि सिडनी आंतरराष्ट्रीय किताब जिंकून त्या आता आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार आहेत. पहिल्या फेरीत त्यांचा सामना कोलंबियाच्या मारियाना डुकू मारिनो आणि ब्राझीलची तेलियाना परेरा या बिनमानांकित जोडीविरुद्ध होणार आहे. स्पर्धेत भारताचे सहा खेळाडू कोर्टवर उतरणार आहेत. त्यात पुरुष एकेरीत युकी भांबरी हा जगातील सहाव्या मानांकित थॉमस बर्डीचविरुद्ध खेळणार आहे. सानियासोबतच रोहन बोपन्नाला दावेदार मानले जात आहे. तो मर्जियासोबत खेळणार आहे. ही जोडी उपविजेती ठरली होती. या वर्षाच्या सुरुवातीला ही जोडी एपिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती. त्यांचा सामना पहिल्या फेरीत उमर जासिका आणि निक किर्गीयोससोबत रंगणार आहे. (वृत्तसंस्था)जोकोविच, सेरेनासमोर किताब वाचविण्याचे आव्हानजागतिक क्रमवारीत नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांच्यासमोर सोमवारपासून (दि. १८) सुरू होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचा किताब वाचविण्याचे आव्हान राहील. या स्पर्धेत रॉजर फेडरर, राफेल नदाल, दुहेरीत मार्टिना हिंगीस यांच्याही कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहील. गतविजेती सेरेना केवळ आपला किताब वाचविण्यासाठी टेनिस कोर्टवर उतरणार नाही, तर स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅमच्या विक्रमाची बरोबरी करण्याचे तिचे लक्ष्य राहील. जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू जोकोविच सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आॅस्ट्रेलियन ओपनमध्येही तो फॉर्म कायम राखण्याची शक्यता आहे. जोकोविच सलामीच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या चुंग हियोनविरुद्ध खेळेल. पुरुष गटात स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर, ब्रिटनचा अँडी मरे, स्पेनचा राफेल नदाल आणि स्टेनिसलास वावरिंका यांच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फेडरर जॉर्जियाच्या निकोलास बेसिलाश्विलीविरुद्ध, तर दुसऱ्या दिवशी मरे वावरिंकाशी झुंजणार आहे. दुसरीकडे अखेरची स्पर्धा खेळणारे लेटीन हेविट, निक किर्गियोस तसेच बर्नार्ड टॉमक चांगली कामगिरी करण्यावर भर देतील. महिला गटात सेरेना विल्यम्ससह रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा यांच्या लढतीवर सर्वांची नजर राहील. सेरेना आणि मारिया स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तसेच सिमोना हालेप, गरबाईन मुगुरुजा, एंजेलिक कर्बर, व्हिक्टोरिया अजारेंका, एग्निस्का रंदवास्का, पेत्रा क्विटोव्हा जेतेपद मिळविण्यासाठी टेनिस कोर्टवर उतरणार आहे.(वृत्तसंस्था)
सानिया-हिंगीसचे लक्ष्य जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 3:28 AM