मियामी : भारताची टेनिस तारका सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने तीमिया बाबोस व क्रिस्टिना म्लादेनोविच जोडीचा पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत अंतिम फेरीत धडक मारली. त्याचप्रमाणे या विजयाबरोबरच त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याकडे एक पाऊल पुढे टाकले. दरम्यान, पुरुष गटातील एकेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांनी आपापल्या लढती जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवला.महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने ५३८२३५ डॉलर बक्षीस रकमेच्या डब्ल्यूटीए प्रीमियर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सातव्या मानांकित तीमिया बाबोस व क्रिस्टिना म्लादेनोविच या जोडीला ६-२, ६-४ असे पराभूत केले.अंतिम फेरीत सानिया आणि हिंगीस यांची लढत एकाटेरिना मकारोव्हा व एलेन वेस्नीना या जोडीशी होईल. विशेष म्हणजे या जोडीला सानिया आणि हिंगीस यांनी दोन आठवड्यापूर्वी बीएनपी परिबास ओपनच्या अंतिम फेरीत धूळ चारली होती.मकारोव्हा आणि वेस्नीना या द्वितीय मानांकित जोडीने अन्य एका उपांत्य फेरीत आंद्रिया हलावाकोव्हा व लुसी हरादेका या नवव्या मानांकित जोडीला ६-४, ६-२ अशा सरळ सेटस्मध्ये पराभूत करताना त्यांचे आव्हान मोडीत काढले.सामना जिंकल्यानंतर सानियाला मकारोव्हा व वेस्नीना यांना पुन्हा पराभूत करण्यासाठी काय करावे लागेल? असे विचारले असता ती म्हणाली, ‘‘गेल्या आठवड्यात जशी कामगिरी केली तशीच कामगिरी आम्हाला पुन्हा करावी लागेल. आम्ही जगातील सर्वोत्तम जोडीला हरवू शकतो याची आम्हाला जाणीव आहे. ही जोडी देखील चॅम्पियन आहे. आता आम्ही एक दुसऱ्याबरोबर खेळणे शिकले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कडव्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळणे चांगले आहे.’’
सानिया-हिंगीस जोडीची फायनलमध्ये धडक
By admin | Published: April 05, 2015 1:58 AM