ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - टेनिसमध्ये महिला दुहेरीत अव्वल स्थानावर असलेल्या मार्टिना हिंगिस आणि सानिया मिर्झा या जोडीची सलग ४१ विजयाची मालिका अखेर कतार ओपन स्पर्धेत खंडीत झाली. स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात इंडो-स्विस जोडीचा एलेना वेसनिना आणि डारीया कासाटकीना या रशियन जोडीने २-६,६-४,१०-५ असा पराभव केला.
दोहामध्ये पराभूत होण्यापूर्वी मार्टिना-सानिया जोडीने महिला दुहेरीचे सलग तीन ग्रँण्डस्लॅम किताब जिंकले. कतार ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठतानाही या जोडीला संघर्ष करावा लागला होता. बिनसीडेड चायनीस जोडीविरुद्ध विजय मिळवण्यासाठी तीन सेटपर्यंत संघर्ष करावा लागला होता.
कतार ओपनच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये वर्चस्व गाजवूनही सानिया-मार्टिना जोडीने हा सामना गमावला. कतार ओपन स्पर्धेपूर्वी ही जोडी भन्नाट फॉर्ममध्ये होती. या पराभवामुळे महिला दुहेरीत सर्वाधिक विजयाचा विश्वविक्रम रचण्याची त्यांची संधी हुकली. १९९० च्या दशकात जाना नोवोटना आणि हेलेना सुकोव्हा या जोडीने सलग ४४ सामने जिंकले होते.