ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १५ - भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत चषकावर नाव कोरले. सानिया- मार्टिनाचा हा सलग ३० वा विजय असून त्यांच्या जोडीचा हा ११ वा किताब आहे. अंतिम फेरीत त्यांनी कॅरोलिन ग्रेसिया आणि क्रिस्टिना म्लॅडेनॉव्हिक यांच्या जोडीचा १-६, ७-५, १०-५ असा पराभव केला.
काल झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी रुमानियाची रालुका ओलारू आणि कजाकिस्तानची यारोस्लावा श्वेडोव्हा या जोडीवर विजय मिळवत सलग विजय मिळविण्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला होता.
जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली सानिया आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेली हिंगीस यांनी २०१६ या नववर्षात दुसऱ्या किताबा नावावर केला. त्या दोघांनी गेल्या आठवड्यात ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना विजेतेपदाला गवसणी घातली होती. २०१५ साली एकत्र आलेल्या सानिया-मार्टिनाने विम्बल्डन आणि यूएस ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांसह अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.