Sania Mirza Rohan Bopanna, Australian Open Final: भारताची स्टार टेनिसपटूंची जोडी सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. ब्राझीलच्या राफेल मातोस आणि लुएसा स्टेफनी या जोडीने सानिया-रोहन जोडीला दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि विजेतेपदावर नाव कोरले. (Rafael Matos - Luisa Stefani beats Sania Mirza - Rohan Bopanna) त्यांनी ७-६(७-२), ६-२ असा सामना जिंकला. भारतीय जोडीने उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यूएसएच्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७-६(५) ६-७(५) १०-६ असा पराभव केला होता. सानियाने या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, त्यामुळे तिच्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याची तिच्याकडे सुवर्णसंधी होती, पण अखेर तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
भारतीय जोडी सानिया-रोहनला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेलेना ओस्टापेन्को आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ या लॅटव्हियन आणि स्पॅनिश जोडीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला होता. त्यानंतर त्यांची झुंज बुधवारी तिसऱ्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यूएसएच्या डेसिरिया क्रॉझिक यांच्याशी झाली. तो सामना चांगलाच रंगला आणि त्यात भारतीय जोडीने त्यांचा ७-६(५) ६-७(५) १०-६ असा पराभव केला. तो फॉर्म पाहता आजच्या सामन्यात भारतीय जोडी विजय मिळवेल अशी आशा क्रीडारसिकांना होती. पण ब्राझीलच्या जोडीने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. राफेल मातोस आणि लुएसा स्टेफनी जोडीने सानिया-रोहनला फारशी झुंज देऊच दिली नाही. पहिले काही गेम गमावल्यानंतर सानिया-रोहनने अनुभव पणाला लावत कमबॅक केले. पहिला सेट बरोबरीत पोहोचल्यानंतर अखेर टायब्रेकरमध्ये ब्राझीलच्या जोडीने तो सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा झुंज पाहायला मिळेल असे वाटले होते, पण एकतर्फी आक्रमणामुळे भारतीय जोडी पराभूत झाली आणि ब्राझीलने सामना ७-६(७-२), ६-२ असा सहज जिंकला.
सानियाने आधीच केली होती निवृत्तीची घोषणा
सानिया मिर्झा ही भारताची लोकप्रिय टेनिसपटू आहे. सानिया मिर्झा काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाली. पण त्यानंतरही तिने भारताकडून टेनिस खेळणं सोडलं नाही. लग्नानंतर सुमारे १२ वर्षे सानियाने भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना सानिया म्हणाली होती, "मी असा निर्णय घेतला आहे की हा माझा शेवटचा हंगाम असणार आहे. सध्या मी आठवड्या-आठवड्याचे प्लॅनिंग करतेय. मला हा संपूर्ण हंगाम खेळायचा आहे. मला माहिती नाही की फिटनेसच्या तक्रारींमुळे मला संपूर्ण हंगाम खेळता येईल की नाही, पण पूर्ण हंगाम खेळण्याचा माझा प्रयत्न असेल."
सानियाची कारकीर्द
मूळची हैदराबादची असलेली सानिया २००३ सालापासून टेनिस खेळत आहे. १९ वर्षांपासून ती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन आणि सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदं हे सानियाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. भारतीय महिला टेनिसपटूंच्या इतिहासात सानिया जागतिक क्रमवारी सर्वोत्तम २७ व्या स्थानी विराजमान झाली होती. २००७ साली तिने हा पराक्रम केला होता. आज तिच्या कारकीर्दीचा शेवट उपविजेतेपदाने झाला.