चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मी खूप उत्साही आहे. ऑलिम्पिकची तयारी फारच चांगली झाली. कोरोना काळात गेल्या काही आठवड्यात काही प्रमुख सामने खेळायला मिळणे आनंददायी होते. अंकितादेखील चांगला सराव करू शकली. कोरोनाला न जुमानता ऑलिम्पिक आयोजन करण्यात येत आहे. खेळाडूंची योग्य ती खबरदारी घेत प्रोटोकॉल आखण्यात आले. भारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिक सहभाग निश्चित करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम राबविली शिवाय बायोबबलची व्यवस्था केली. हे पाऊल प्रशंसनीय म्हणावे लागेल. आता आम्ही सर्वाेत्तम निकाल देण्यास उत्सुक आहोत.
खेळाडूंचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सरकार किती प्रयत्नशील आहे याचे ताजे उदहारण चार्टर विमानाची केलेली व्यवस्था. आंतरराष्ट्रीय विमानप्रवास बंदी असताना हे पाऊल सोपे नव्हते. टोकियोत आमच्या चांगल्या कामगिरीसाठी सरकारचे सर्वोत्तम प्रयत्न आमची वाटचाल भक्कम करणारे ठरतील.
वैयक्तिकरीत्या सांगायचे तर खेळाडूच्या प्रवासासंबंधी निर्माण झालेले अडथळे दूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा मला चांगला अनुभव आहे. तुम्ही खेळाडू असाल आणि त्यातही आई असाल तर तर अधिक आव्हाने येतात. क्रीडा व परराष्ट्र मंत्रालयाने सर्वंकष प्रयत्न करीत माझ्यासाठी तसेच माझ्या वर्षभराच्या मुलासाठी युरोपमधून प्रवासाचा व्हीसा मिळविला. माझा प्रवास यामुळे सोपा होऊ शकला.
आता आम्ही टोकियोमध्ये आहोत. सांघिकपणे एकत्र आहोत. कोट्यवधी भारतीयांना आमच्याकडून अनेक अपेक्षा असल्याची जाणीव आहे. भारतीयांच्या शुभेच्छा उत्कृष्ट कामगिरी करण्याचे सामर्थ्य प्रदान करणाऱ्या ठरतील. जागतिक पातळीवरील सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत कोर्टवर परतल्याचा मला विशेष आनंद वाटतो. माझ्यापरीने सर्वोत्कृष्ट निकालाचा प्रयत्न देखील करणार आहे.
- (सानिया मिर्झा सहा वेळेची दुहेरी ग्रॅन्डस्लॅम चॅम्पियन टेनिसपटू आहे.२०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये ती मिश्र दुहेरीचा उपांत्य सामना खेळली होती.)