नवी दिल्ली: भारताची स्टार महिला टेनिसपटूसानिया मिर्झा हिने अचानक टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरी गटात पहिल्याच फेरीत सानिया पराभूत झाली. या पराभवानंतर सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा जाहीर केली. २०२२चा हंगाम हा तिचा शेवटचा हंगाम असेल असं सांगत फिटनेसच्या तक्रारींमुळे तिने टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं.
मिर्झा ही भारताची लोकप्रिय टेनिसपटू आहे. सानिया मिर्झा काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाली. पण त्यानंतरही तिने भारताकडून टेनिस खेळणं सोडलं नाही. लग्नानंतर सुमारे १२ वर्षे सानियाने भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना सानिया म्हणाली, "मी असा निर्णय घेतला आहे की हा माझा शेवटचा हंगाम असणार आहे. सध्या मी आठवड्या-आठवड्याचे प्लॅनिंग करतेय. मला हा संपूर्ण हंगाम खेळायचा आहे. मला माहिती नाही की फिटनेसच्या तक्रारींमुळे मला संपूर्ण हंगाम खेळता येईल की नाही, पण पूर्ण हंगाम खेळण्याचा माझा प्रयत्न असेल."
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया आणि तिची उक्रेनची सहकारी नादिया किचनोक यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दीड तास चाललेल्या सामन्यात स्लोव्हेनियाच्या तमारा झिदान्सेक आणि काजा जुवान जोडीने त्यांना ४-६, ६-७ (५) अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. सानियाचे महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले असले तरी रोहन बोपण्णासोबतच मिश्र दुहेरीतील आव्हान अद्याप जिवंत आहे.
मूळची हैदराबादची असलेली सानिया २००३ सालापासून टेनिस खेळत आहे. १९ वर्षांपासून ती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन आणि सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदं हे सानियाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. भारतीय महिला टेनिसपटूंच्या इतिहासात सानिया जागतिक क्रमवारी सर्वोत्तम २७ व्या स्थानी विराजमान झाली होती. २००७ साली तिने हा पराक्रम केला होता.