नवी दिल्ली : दिग्गज टेनिसस्टारसानिया मिर्झाच्या (sania mirza) महिला दुहेरी कारकिर्दीचा रविवारी निराशाजनक शेवट झाला. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या दुसऱ्या फेरीत सानियाचा पराभव झाला. या सामन्यात सानिया आणि तिची सहकारी ॲना डॅनिलिना यांना एनहेलिना कालिनिना आणि ॲलिसन व्हॅन उयटवांक या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
महिला दुहेरीत पराभव सानिया मिर्झा आणि ॲना डॅनिलिना या आठव्या मानांकित जोडीचा मेलबर्न पार्क येथील कोर्ट 7 वर दोन तास आणि एक मिनिट चाललेल्या सामन्यात 4-6, 6-4, 2-6 असा पराभव झाला. सानिया मिर्झा कोर्टातून बाहेर पडताच संधी गमावल्याची निराशा सानियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन हे तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे सानियाने अलीकडेच जाहीर केले होते. दुबईतील WTA 1000 स्पर्धेनंतर फेब्रुवारीमध्ये ती निवृत्त होणार आहे.
ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या ग्रँडस्लॅम सामन्यात सानिया आणि तिच्या जोडीदाराने काही चुका केल्या. त्यामुळे त्यांना सामन्यात शेवटपर्यंत संयम राखता आला नाही. खरं तर ती आणि तिच्या जोडीदाराने सामन्यात 38 चुका केल्या तर त्यांच्या विरोधकांनी 22 चुका केल्या. सानिया मिर्झाने 3 महिला दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"