मियामी : भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार झेक प्रजासत्ताकाची बारबोरा स्ट्राइकोव्हाने मियामी टेनिस स्पर्धेत मार्टिना हिंगीस आणि चान यंग जान या जोडीचा चुरशीच्या लढतीत पराभव करून मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सानिया आणि बारबोरा यांना पहिल्या सेटमध्ये सूर न गवसल्यामुळे हिंगीस-जान जोडीकडून ६-७ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-बारबोराने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पाचवे मानांकन असलेल्या हिंगीस-जान जोडीचा ६-१ने पराभव करून १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र सानिया-बारबोरा जोडीने हिंगीस-जान यांना कोणतीही संधी न देता उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत १०-४ने सेट जिंकून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. सानिया-बारबोरा या तिसऱ्या मानांकित जोडीची अंतिम फेरीत कॅनडाची गॅब्रियला डाब्रोवस्की आणि चीनची झू यिफान या बिगर मानांकित जोडीविरुद्ध विजेतेपदासाठी लढत होईल.(वृत्तसंस्था)
सानिया-स्ट्राइकोव्हा अंतिम फेरीत
By admin | Published: April 02, 2017 2:10 AM