मेलबोर्न : सानिया मिर्झा तिचा क्रोएशियाचा सहकारी इवान डोडिगच्या साथीने रविवारी आॅस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये खेळेल त्या वेळी तिची नजर सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यावर केंद्रित झालेली असेल. भारत व क्रोएशियाच्या जोडीने रविवारी विजय मिळवला तर सानियाचे डोडिगच्या साथीने पहिले ग्रँडस्लॅम व कारकिर्दीतील चौथे मिश्र दुहेरीचे जेतेपद ठरेल. सानिया व डोडिग या दुसऱ्या मानांकित जोडीला रविवारी अंतिम लढतीत अमेरिकेच्या एबिगेल स्पियर्स व कोलंबियाच्या युआन सबेस्टियन कबाल या बिगरमानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सानियाने आतापर्यंत मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी तिने ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसच्या साथीने २०१४ मध्ये अमेरिकन ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते. सानिया व डोडिगने गेल्या वर्षी फे्रंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण या जोडीला लिएंडर पेस व मार्टिना हिंगीस यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सानियाने पाचव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. २००८ मध्ये महेश भूपतीच्या साथीने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर त्यानंतरच्या वर्षी या जोडीने जेतेपद पटकावले होते. २०१४ मध्ये होरिया तेकाऊच्या साथीने सानिया उपविजेती ठरली होती. (वृत्तसंस्था)
सानियाची नजर सातव्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर
By admin | Published: January 29, 2017 4:45 AM