नवी दिल्ली : भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झाने तिची माजी जोडीदार स्वीत्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस हिला नमवून सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धा जिंकतानाच डब्ल्यूटीए महिला दुहेरी रँकिंगवर टॉपचे स्थान मिळवले आहे. या पराभवामुळे मार्टिना हिंगीस दुसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. सानिया टॉपवर पोहोचली असतानाच पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांच्या क्रमवारीत मात्र घसरण झाली आहे.सानिया आणि स्वीत्झर्लंडची हिंगीस या सिनसिनाटी ओपनमध्ये खेळण्याआधी डब्ल्यूटीए महिला दुहेरी रँकिंगमध्ये संयुक्तरीत्या अव्वल स्थानी होत्या; परंतु सानियाने तिची नवीन जोडीदार झेक प्रजासत्ताकच्या बारबोरा स्ट्राइकोव्हा हिच्या साथीने आणि हिंगीस व तिची नवीन जोडीदार कोको वेडेवेगे यांना ७-५, ६-४ अशा सलग सेटमध्ये पराभूत करीत विजेतेपद पटकावले. हिंगीस या पराभवाबरोबरच रँकिंगमध्ये एका स्थानाने घसरून दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.सानिया व मार्टिन हिंगीस या वेगवेगळ्या झाल्यानंतर ही पहिली स्पर्धा होती आणि त्यात या दोघीही अंतिम सामन्यात आमने-सामने होत्या. रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून देऊन शकणाऱ्या सानियाचे आता ११२६0 रँकिंग गुण आहेत आणि ती महिला दुहेरीत एकटी अव्वल स्थानावर आहे, तर हिंगीस १0९४५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)एकमेकांच्या साथीने तीन ग्रँडस्लॅमसह एकूण १४ स्पर्धा जिंकणारी सानिया-हिंगीस जोडी सिंगापूरमध्ये आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या वर्षअखेरीस डब्ल्यूटीए टूर चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली असून, ते या स्पर्धेत एकत्र खेळणार आहेत. दुसरीकडे भारतीय पुरुषांच्या दुहेरी रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. रिओत सानियासोबत मिश्र दुहेरीत कास्यपदक लढतीत पराभूत होणाऱ्या बोपन्नाची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो १७ व्या स्थानावर फेकला गेला आहे, तर रिओत आपली अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा बोपन्नाच्या साथीने खेळणाऱ्या पेसची तब्बल १0 स्थानांनी घसरण होऊन तो ७२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दिविज शरणची एका स्थानाने सुधारणा झाली असून, तो ६८ व्या स्थानावर पोहोचला आहे. पुरुष एकेरीत साकेत मिनैनीची एका स्थानाने घसरण झाली आहे; परंतु तो १४३ व्या क्रमांकावर असून, भारताचा तोअव्वल खेळाडू आहे. युकी भांबरी १७१ व्या स्थानावर आहे.
हिंगीसला नमवत सानियाची बाजी
By admin | Published: August 23, 2016 4:19 AM