नाशिक : चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकामुळे संजीवनीने आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक पटकाविले. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.राष्ट्रकुलची पात्रता मिळू न शकल्याने निराश न होता संजीवनीने आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. चीन येथील आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्रांझ पदक मिळविलेल्या संजीवनीने दक्षिण आशियाईमध्ये सुवर्ण पदक पटकावत आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा सूचक इशारा दिला आहे.दक्षिण आशियाईमध्ये ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत संजीवनीला शारीरिक क्षमता आणि प्रबळ मनोबल दाखविण्याची संधी असल्याने तिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. या कामगिरीमुळे संजीवनीला आणखी एक आंतरराष्टÑीय पदक मिळाले असून, या हंगामात तिने आतापर्यंत सहा विविध पदके मिळविली आहेत.राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अवघ्या काही अंतरामुळे हुकल्याने नाशिककरांना हळहळ वाटली होती. तिनेही हा अनपेक्षित पराभव असल्याचे सांगत आगामी स्पर्धांमध्ये जिद्दीने खेळण्याचे आश्वासन तिच्या चाहत्यांना दिले होते. त्यानुसार भूतान स्पर्धेत तिने थेट सुवर्ण जिंकत अॅथलेटिक्स आणि क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे नाव उंचावले आहे.
संजीवनीची ‘सुवर्ण’ धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:58 AM