नागपूर : संकल्प गुप्ता. महाराष्ट्राचा १८ वर्षांचा बुद्धिबळपटू. त्याच्या नावातच जिंकण्याचा कायम निर्धार असतो. सर्बियातील बेलग्रेड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय रेटिंग राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत आठ फेऱ्यांमध्ये सात गुणांची कमाई करीत संकल्पने ग्रॅन्डमास्टरचा पहिला नॉर्म गुरुवारी पूर्ण केला. फिडेच्या नियमानुसार पूर्ण ग्रॅन्डमास्टर होण्यासाठी २५०० वर येलो रेटिंग आणि तीन नॉर्म पूर्ण करणे आवश्यक असते. २४६४ येलो रेटिंग असलेल्या संकल्पने पहिला टप्पा सर केला. पुढील दोन नॉर्म पूर्ण करताच रौनक साधवानी आणि दिव्या देशमुख यांच्यापाठोपाठ नागपूरचा तो तिसरा ग्रॅन्डमास्टर बनेल. मागच्या महिन्यात बांगला देशात झालेल्या ‘शेख हसिना आंतरराष्ट्रीय ग्रॅन्डमास्टर’ स्पर्धा जिंकणारा संकल्प बेलग्रेडमध्ये पहिला नॉर्म पूर्ण करण्याच्या निर्धारानेच खेळला. या यशाबद्दल तो म्हणतो,‘ मी केवळ विजयासाठीच खेळतो. प्रतिस्पर्धी कोण हे महत्त्वपूर्ण नाही. संधी आली की सोडायची नाही. बॅकफुटवर असेल तेव्हा यशस्वी बचावही करायचा.’बजेरियाच्या मारवाडी चाळभागात राहणाऱ्या संकल्पचा या खेळात प्रवास सुरू झाला तो २००७ ला. नयनदीप कोटांगळे यांच्या मार्गदर्शनात घडलेला हा खेळाडू वयाच्या पाचव्यावर्षी नागपुरात राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला. पहिलाच सामना ५० वर्षांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध जिंकलादेखील. या स्पर्धेत संकल्पला चार गुणांची कमाई झाली. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत संकल्पने देशात आणि विदेशात चांगली प्रगती केल्यामुळे खेळाप्रती समर्पित झाला. वडील संदीप सूरजभान गुप्ता बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे कायम प्रोत्साहन मिळते. आई सुमन गुप्ता संकल्पच्या दौऱ्यांचे यशस्वी नियोजन करतात. भाऊ सारांश हा पिस्तूल नेमबाज आहे. कोरोनामुळे जवळपास १६ महिन्यांचा काळ वाया गेला, अन्यथा संकल्प वर्षभराआधीच ग्रॅन्डमास्टर बनला असता, असे त्याच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दोन नॉर्म लवकर गाठणार...संकल्प हा दीक्षाभूमीस्थित डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये बीबीएच्या प्रथम वर्षाला शिकतो. अभ्यासातही तो हुशार आहे. बेलग्रेडमधून आई-बाबांशी बोलताना त्याने लवकरच आणखी दोन नॉर्म पूर्ण करण्याच्या निर्धार व्यक्त केला. ‘कोरोना संकट नसते, तर १२ वीची परीक्षा देण्याआधीच ग्रॅन्डमास्टर बनू शकलो असतो,’ अशी खंतही संकल्पने व्यक्त केली. तो जिंकण्यासाठीच खेळतो : कोटांगळेसंकल्पला बुद्धिबळात आणणारे बालपणीचे कोच नयनदीप कोटांगळे यांनी सांगितले की,‘ संकल्पचा पटावर पूर्ण ‘फोकस’ असतो. कितीही दिग्गज खेळाडू त्याच्यापुढे असेल, तरी त्याच्यावर विजय नोंदविण्याचा निर्धार जोपासून खेळत असल्याने बुद्धिबळातील संकल्पची प्रगती अनेकांना खुणावणारी ठरते. बेलग्रेडला रवाना होण्याआधी त्याने मला ग्रॅन्डमास्टरचा नॉर्म मिळविणार, असे सांगितले होते. पुढील काही महिन्यांत संकल्प गुप्ताच्या रूपाने नागपूरला आणखी एक युवा ग्रॅन्डमास्टर मिळेल, सर्बियात उपविजेताआंतरराष्ट्रीय मास्टर संकल्प सर्बियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी उपविजेता राहिला. ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्याने ८.५ गुणांची कमाई केली. संकल्प तसेच भारताचा त्याचा सहकारी ग्रॅन्डमास्टर इनियाम पी. यांचे सारखे ८.५ गुण होते.
विजयाचाच ‘संकल्प’ जोपासणारा बुद्धिबळपटू! संकल्प गुप्ताने सर्बियात गाठला ‘ग्रॅन्डमास्टर’चा पहिला नॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 10:03 AM