नेमबाज सरबजोत सिंग आणि मनू भाकर या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर निशाणा साधला. ऑलिम्पिक म्हणजे खेळाडूंसाठी स्वत:ची एक ओळख बनवण्याचे मोठे व्यासपीठ असते. सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत सरबजोत सिंग-मनू भाकर जोडीने कांस्य पदक पटकावले. पदक जिंकल्याबद्दल हरयाणा सरकारने सरबजोतला मोठी भेट दिली.
सरबजोत सिंग पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आणि त्याने पदकाची कमाई करून भारतीयांना खुशखबर दिली. सरबजोतचा जन्म ३० सप्टेंबर २००१ रोजी अंबाला येथे झाला. त्याने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली. सरबजीतने उन्हाळी शिबिरात काही मुलांना एअर गन शूट करताना पाहिले होते. त्यातून प्रेरणा घेत त्याने हा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याचा शूटिंगमधील प्रवास सुरू झाला. सरबजोतने २०२३मध्ये पंजाब विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली.
हरयाणा सरकारची घोषणा
कांस्य पदक जिंकणाऱ्या सरबजोतला हरयाणा सरकार २.५ कोटी रूपयांचे बक्षीस देणार आहे. याशिवाय त्याला सरकारी नोकरी देखील दिली जाईल, अशी माहिती हरयाणाचे क्रीडा राज्यमंत्री संजय सिंग यांनी दिली. त्यांनी सरबजोतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
दरम्यान, भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. मनू भाकरने वैयक्तिक एक आणि मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने एक पदक जिंकले. याशिवाय गुरुवारी मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळेने कांस्य पदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने अंतिम फेरी गाठली अन् गुरुवारी देशवासियांना कांस्य जिंकून खुशखबर दिली. भारताला शूटींमधून आणखी एक पदक मिळाले असून, एकूण तीन पदकांची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले.