ग्लास्गो : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि मिडफिल्डर सरदारसिंह याला ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी होणाऱ्या उपांत्य फेरीतून निलंबित करण्यात आले.भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान गुरुवारी ‘अ’ गटाच्या सामन्यादरम्यान सरदारला खतरनाक पद्धतीने खेळल्याबद्दल यलो कार्ड दाखवण्यात आले होते. हा सामना भारताने ५-२ असा जिंकला होता. या सामन्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सरदारला दोन सामने निलंबित करण्याचा निर्णय सुनावण्यात आला होता. तथापि, नंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने या शिक्षेला विरोध केल्यानंतर सरदारला फक्त एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाच्या या निर्णयामुळे सरदारसिंह न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी उपांत्य फेरीत खेळू शकणार नाही. हॉकी संघाचे प्रशिक्षक एम. के. कौशिक म्हणाले, सरदारने जाणीवपूर्वक हे केले नव्हते; परंतु त्याला यलो कार्ड दाखवण्यात आले. याआधीही त्याला या अयोग्य वर्तनासाठी ताकीद देण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
सेमीफायनलसाठी सरदार निलंबित
By admin | Published: August 02, 2014 12:11 AM