अस्ताना : गतवेळची रौप्य पदक विजेती आणि द्वितीय मानांकित सरजूबाला देवी (४८ किलो) तसेच सीमा पूनिया (८१ किलोहून अधिक) यांनी आपआपल्या वजनी गटात चमकदार कामगिरी करताना एआयबीए महिला वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. बलाढ्य एमसी मेरी कोम (५१ किलो), एल. सरिता देवी (६० किलो) आणि पूजा रानी (७५ किलो) यांची आॅलिम्पिकवारी हुकल्यानंतर भारतासाठी सोमवारचा चांगला दिवस ठरला. माजी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियन सरजूबालाने श्रीलंकेच्या इरांदी के. हिला ३-० असे सहजपणे लोळवले. पुढील फेरीत तीच्यापुढे कजाखस्तानच्या नजीम काइजबेचे कडवे आव्हान असेल. नजीमने स्वीडनच्या लीसे सेंडेबेरला ३-० असा धक्का देत आगेकूच केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला, सीमाने अजरबैजानच्या अइनूर जायेवाचे आव्हान परतावून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. सीमापुढे पुढच्या फेरीत चीनच्या शिचिन वांगचे आव्हान आहे. वांगने उजेबेकिस्तानच्या गुजार इसमातोवाला पराभूत करुन आगेकूच केली. दरम्यान पवित्रा (६३ किलो) आॅस्टे्रलियाच्या स्काइ निकोलसन विरुध्द पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर पडली आहे. (वृत्तसंस्था) .................................
सरजूबाला, सीमा उपांत्यपुर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 8:31 PM