दीपक देशमुख
सातारा : बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या जागतिक खुल्या गटातील तिरंदाजी स्पर्धेत सातारची सुकन्या अदिती स्वामीने पुन्हा सुवर्णवेध साधला आहे. सांघिक प्रकारात आदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर यांच्या संघाने मेक्सिकोला हरवत भारताला विजेतेपद मिळवून दिले तर वैयक्तिक गटातही आदितीने सुवर्णपदक पटकावले. यामुळे सातारच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे.
बर्लिन येथील खुल्या गटातील जागतिक तिरंदाजी स्पर्धांत भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाने कोलंबिया संघावर २२०-२१६ ने विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. यानंतर अंतिम सामन्यात तुल्यबळ मेक्सिको संघाशी लढत होती. भारताच्या अदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत २३५-२२९ ने मेक्सिकोचा पराभव केला व विश्व अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत एकूण ६४ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते.
वैयक्तिक गटातही सुवर्णपदक
अदिती स्वामी हिने वैयक्तिक गटातही चमकदार कामगिरी केली. अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात मेक्सिकोच्याच ॲन्द्रिया बेसेरा हिचा १४९-१४७ पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे.
सुवर्णपदक पटकाविताच अदितीने माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते. ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे असल्याचा निर्धार केला.