मुंबई : 'अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है', या डायलॉगप्रमाणे सातारच्या अदिती स्वामीने जागतिक पातळीवर घवघवीत यश मिळवले. अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या डोंगराएवढ्या यशानंतर अदितीने 'लोकमत'शी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लेखाच्या सुरूवातीला ज्याचा उल्लेख केला तो डायलॉग सांगून अदितीने आपल्या यशाचा मंत्र सोप्या शब्दांत सांगितला. वयाच्या नवव्या वर्षापासून सुरू केलेला संघर्ष आज फळ देत असल्याची भावना अदितीची आहे.
१७ वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली. तिने महिलांच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. शुक्रवारी सांघिक आणि शनिवारी वैयक्तिक सुवर्ण जिंकून अदितीने तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर वडील पेशाने शिक्षक आहेत. तिला एक लहान भाऊ असून तो देखील आर्चरीमध्ये नशीब आजमावत आहे.
अदितीचं घवघवीत यश 'लोकमत'शी संवाद साधताना अदितीने म्हटले, "मी सातारची असून शेरेवाडी माझे मूळ गाव आहे. २०१६ मध्ये प्रविण सरांकडे याचे प्रशिक्षण घेतले अन् तेव्हापासून माझ्या या कारकिर्दीची सुरूवात झाली. शुक्रवारी सांघिक खेळी करताना समोर कोण आहे याची पर्वा न करता सामना केला. तर, शनिवारी देखील माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केल्याने मला हे यश मिळाले."
ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर बोलताना अदितीने म्हटले, "माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते... ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे". ऐतिहासिक विजयानंतर अदिती भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
सातारच्या लेकीची सोनेरी कामगिरी अदितीचे वडील पेशाने शिक्षक आहेत, तर आई आंबवडी या गावची ग्रामसेवक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूणीचं हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. तिचा भाऊ देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तिरंदाजीचा सराव करत आहे. २०१६ मध्ये अर्थात ९ वर्षांची असताना अदितीने या क्षेत्रात पाऊल ठेवले अन् २०१९ पासून महाराष्ट्रासाठी पदक जिंकले. राज्यस्तरावर चमकल्यानंतर २०२१ पासून अदिती आजतागायत भारतासाठी पदकांची कमाई करत आहे.