नॉटिंघम : कसोटी क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच अर्धशतकाची वेस ओलांडता आल्यामुळे आनंद झाला पण, त्यापेक्षा इंग्लंडला वर्चस्व मिळवून दिल्यामुळे अधिक आनंद झाला, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने व्यक्त केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अँडरसन पत्रकार परिषदेत बोलत होता. अँडरसनच्या खेळीने इंग्लंडला सामन्यात परतण्यास मदत झाली.अँडरसनने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना ८१ धावा फटकाविल्या. अँडरसनने जो रुटसह (नाबाद १५४) शेवटच्या विकेटसाठी विक्रमी १९८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४९६ धावांची मजल मारता आली आणि ३९ धावांची आघाडी घेण्यात यश आले.अँडरसन म्हणाला, ‘अशा प्रकारची फलंदाजी करणे आणि विक्रमी भागीदारी नोंदविणे, माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. संघाला सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याची संधी प्रदान करण्यात यशस्वी ठरल्यामुळे मला आनंद झाला. यापूर्वी माझी सर्वोच्च कामगिरी नाबाद ४९ धावा अशी होती, पण ही कामगिरी कसोटी क्रिकेटमध्ये घडलेली नव्हती. त्या लढतीत आम्ही विजय मिळविला होता. ८१ धावांच्या खेळीमुळे विजय मिळविण्यात यश येईल का? याबाबत उत्सुकता आहे.
कामगिरीवर समाधानी : अँडरसन
By admin | Published: July 14, 2014 5:21 AM