नवी दिल्ली: पॅरालिम्पिक कोच सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने त्यांचे नाव द्रोणाचार्य यादीतून वगळले आहे. अर्जुन व खेलरत्नची पुरस्कार यादी मात्र कायम आहे.याचा अर्थ टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि भारोत्तोलक संजीता चानू यांना यंदा अर्जुन पुरस्कार मिळणार नाही. क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले. ते निरपराध आहेत असे सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्या नावाचा विचार होईल. क्रीडामंत्री विजय गोयल यांची मंजुरी मिळताच विजेत्यांना ई-मेल पाठविण्यात आले.निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी दोन पॅराअॅथ्लीटसह १७ खेळाडूंच्या नावाची तसेच खेलरत्नसाठी देवेंद्र झझारिया आणि सरदारासिंग यांच्या नावाची शिफारस केली आहे. पॅराअॅथ्लीट दीपा मलिकच्या नावाची खेलरत्नसाठी शिफारस हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली पण यादीत बदल झालेला नाही. भारतीय भारोत्तोलन महासंघाने चानूच्या (४५ गुण) नावाचा यादीत समावेश करण्याची विनंती केली होती. निवड समितीच्या एका सदस्याने मात्र ,‘गुण हे संपूर्ण मापदंड ठरत नाहीत. असे असते तर चौरसिया, पुजारा, हरमनप्रीतकौर यांना पुरस्कार मिळाला नसता.कोण आहेत सत्यनारायण... सत्यनारायण हे रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलू याचे कोच आहेत. द्रोणाचार्यसाठी त्यांचे नाव येताच काहींनी टीकाही केली होती. विरोधकांचा जळफळाट झाल्याने माझ्याविरुद्ध बदनामीची मोहीम उघडली. निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी दिली जावी, या आशयाचे पत्र सत्यनारायण यांनी १३ आॅगस्ट रोजी क्रीडा मंत्रालयाला लिहिले होते. मरियप्पन यानेही मंत्रालयाला पत्र लिहून सत्यनारायण यांचे नाव पुढे केले तर ‘क्लीन स्पोर्टस्’कडून माजी धावपटू अश्विनी नाचप्पा हिने मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात सत्यनारायण यांच्या नावाला विरोध दर्शविला होता.रोहन बोपन्ना देशासाठी खेळला नाही...रोहन बोपन्नाचा यादीत समावेश होऊ शकतो की नाही यावर वाद झाला. रोहनचे नाव एआयटीएने उशिरा पाठविले होते. पण साकेत मिनेनीचे यश रोहनच्या तुलनेत मोठे असल्याने त्याच्या नावाचा विचार करण्यात आला. बोपन्नाने फ्रेंच ओपनच्या मिश्र प्रकाराचे जेतेपद पटकविले आहे. ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा तो देशाचा चौथा खेळाडू बनला. रिओमध्ये तो चौथ्या स्थानावर होता. जिम्नॅस्टिकमध्ये चौथे स्थान मिळविणारी दीपा कर्माकर हिला खेलरत्न मिळू शकतो, तर बोपन्नाला ‘अर्जुन’ का नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. अनेकांचे मत असेही आहे, की दीपाच्या कामगिरीची तुलना रोहनच्या मिश्र प्रकारातील यशासोबत करण्यात येऊ नये. दीपाच्या कामगिरीनंतर भारतात जिम्नॅस्टिकसंदर्भात जागरुकता आली. काहींच्या मते इंचियोन आशियाडमधील अनुपस्थितीचा बोपन्नाला फटका बसला.
न्यायालयाचा अवमानप्रकरणी माझ्याविरुद्ध न्यायालयात आरोप प्रलंबित आहे. आरोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही. द्रोणाचार्य पुरस्कार यादीतून नाव वगळणे चुकीचे आहे. भारतीय पॅरालिम्पिक समितीतून हकालपट्टी झालेल्या एका व्यक्तीने माझी खोटी तक्रार केली. एका व्यक्तीच्या खासगी तक्रारीवर तातडीने ही कारवाई झाली. अवमानना प्रकरणात मला केवळ नोटीस मिळाली आहे. या आधारे द्रोणाचार्यपासून वंचित ठेवण्यात आले हे योग्य नाही. पुरस्कार मिळविण्यासाठी मी न्यायालयाचे दार ठोठावावे हे मनाला पटणारे नाही. क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचा आदर करतो पण मी काहीही चुकीचे केले नाही, हे जगाला सांगू इच्छितो. मी समितीला पत्र लिहून बाजू मांडण्यासाठी वेळ मागितली होती पण संधी नाकारण्यात आली. पीसीआयचे माजी अध्यक्ष राजेश तोमर यांची बाजू न घेतल्याची ही शिक्षा असावी असे वाटते.- सत्यनारायण शिमोगा, कोच पॅराअॅथ्लेटिक्स