आकाश नेवे, नागपूरटी-२० विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणत हाँगकाँगच्या विजयाच्या आशेवर पाणी पाडले. हाँगकाँगने २० षटकांत १२७ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार स्कॉटलंडला विजयासाठी दहा षटकांत ७६ धावांचे आव्हान देण्यात आले. हे आव्हान स्कॉटलंडने ८ गडी आणि दोन षटके राखून ७८ धावा करून सहज पूर्ण केले. हाँगकाँग विरोधात ७६ धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर जॉर्ज हुस्ने याने ११ चेंडूंतच चार चौकारांसह १९ धावा केल्या. नदीम अहमदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मॅट क्रॉसने १४ चेंडूत २२ धावा केल्या. त्याने १ उत्तुंग षटकार आणि दोन खणखणीत चौकार लगावले. त्याने ऐजाज खानच्या गोलंदाजीवर निजाकत खानकडे झेल दिला. त्याने कोएत्झरबरोबर ३६ धावांची भागीदारी केली. काएल कोएत्झरने नाबाद २० तर मॅट मॅकनने नाबाद १५ धावा केल्या. तत्पूर्वी हाँगकाँगने २० षटकांत १२७ धावा केल्या होत्या. हाँगकाँगचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यावर बाबर हयातने १५ धावा केल्या. चॅपमनने ४० धावा केल्या. त्याला अंशुमन राथने २१ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी ४९ धावांची भागीदारी केली. चॅपमनने आपल्या खेळीत १ चौकार आणि १ षटकार ठोकला. मधल्या फळीतील फलंदाज निजाकत खानने १० चेंडूतच दोन उत्तुंग षटकार खेचत १७ धावा केल्या. निजाकतला मॅकनने बाद केले. मोठा फटका मारण्याच्या नादात तो आपली विकेट गमावून बसला. स्कॉटलंडकडून मॅट मॅकनने २६ धावांत दोन गडी बाद केले. तर मार्क वॅट, जोश डेव्ही, गॅव्हिन मेन, डी लांग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
स्कॉटलंडचा शेवट गोड
By admin | Published: March 13, 2016 4:21 AM