केदार लेले (हॉलंड)
टाटा स्टील बुद्धिबळ 2017 : अकरावी फेरी
टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धेच्या अकराव्या फेरीत भारताच्या अधिबन याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. तसेच अनिष गिरी विरुद्ध पेंटेला हरिकृष्ण याने आपली लढत बरोबरीत सोडवली! अनिष गिरी विजयाच्या समीप असताना देखील पेंटेला हरिकृष्ण याने लढत बरोबरीत सोडवली हे विशेष!
अकराव्या फेरीत चीनच्या वुई याने सर्जी कॅराकिन वर वर सफाईदार विजय मिळवला. या फेरीत हीच एकमेव लढत निर्णायक ठरली आणि उरलेल्या सहा लढती बरोबरीत सुटल्या! अनुक्रमे रिचर्ड रॅपोर्ट वि. ल्युक फ़ॅन वेली, वॉएटशेक वि. अरोनियन, दिमित्री आंद्रेकिन वि. वेस्ली सो आणि नेपोम्नियाची वि. एल्यानॉव यांच्यातील लढती बरोबरीत सुटल्या.
मॅग्नस कार्लसन वि. अधिबन
वेगवेगळ्या प्रकारे डावांची सुरुवात आणि बचाव पद्धती अवलंबून ह्या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्यचकित करण्यात अधिबन याने सफलता मिळवली आहे! विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध उत्तम तयारीचा नमुना सादर करीत अधिबन याने त्याला देखील काहीसे संभ्रमात टाकले!
अधिबन याने एका प्याद्याचा बळी दिला जो मॅग्नस कार्लसनने स्वीकारला! या प्याद्याच्या बळी स्विकारल्यामुळे कार्लसनच्या वजिराच्या विभागातील मोहरे (हत्ती, अश्व आणि उंट) यांचा पटावर योग्य विकास होऊ नाही शकला, ज्याचा फायदा अधिबनला झाला. चालीगाणिक अधिबनची पटावरील परीस्थिती बळकट होत गेली.
प्याद्याचा बळी दिल्या पासून अधिबन याने मॅग्नस कार्लसन वर संपूर्ण डावात वर्चस्व गाजवले, पण ऐन मोक्याच्या क्षणी केलेली चूक त्याला महागात पडली. या चुकीमुळे मॅग्नस कार्लसन ने डावात पुनरागमन केले ज्यामुळे कार्लसन आणि अधिबन यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. या निकालामुळे अधिबनची सलग दुसऱ्यांदा विजय नोंदवण्याची नामी संधी हुकलीच! सलग दुसऱ्यांदा अधिबनला थोड्याफार फरकाने यशाने हुलकावणी दिली हे काहीसे दुखःदच म्हणायचे!
अकराव्या फेरीअखेर गुणतालिका
1 वेस्ली सो - 7.5 गुण
2. वीई - 7.0 गुण
3. अरोनियन, कार्लसन, एल्यानॉव - 6.5 गुण प्रत्येकी
6. अधिबन, कॅराकिन - 6.0 गुण प्रत्येकी
8. हरिकृष्ण, अनिष गिरी - 5.5 गुण प्रत्येकी
10. आंद्रेकीन, नेपोम्नियाची, वॉएटशेक - 4.5 गुण प्रत्येकी
13. रॅपोर्ट - 4.0 गुण
14. ल्युक फॅन वेली - 2.5 गुण