गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुस-या वर्षी विजेतेपद पटकाविले. मागील वर्षी पुण्यात झालेल्या दुस-या खेलो इंडिया स्पर्धेत २२७ पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. यंदा मात्र, त्यापेक्षाही अधिक २५६ पदकांची कमाई करुन महाराष्ट्र अजिंक्य ठरला आहे. त्यापाठोपाठ हरियाणा २०० पदाकांसह द्वितीय आणि दिल्ली १२२ पदकांसह तृतीय क्रमांकवर आहे.
गुवाहटी येथील नबीन चंद्र बार्डोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामेश्वर तेली, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, अर्थमंत्री हेमंत विश्वकुमार यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे सहसचिव इम्तियाझ काझी, सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, चंद्रकांत कांबळे, महाराष्ट्राचे पथक प्रमुख विजय संतान, महाव्यवस्थापक अरुण पाटील यांसह सर्व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या संघाने राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, सहाय्यक संचालक उदय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोठे यश मिळविले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि १०१ ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे. हरियाणाने ६८ सुवर्ण, ६० रौप्य आणि ७२ ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे. दिल्लीने ३९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ४७ ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे.
रामेश्वर तेली म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना मैदानावर आणण्याचे काम खेलो इंडिया चळवळीने सार्थ केले आहे. राष्ट्रीय पातळीवरच या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळाला. सर्वानंद सोनोवाल यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतुक करताना त्यांचे आभारही मानले. तुमच्या कौशल्याने आणि कामगिरीने आसामला या खेलो इंडियामध्ये वेगळी ओळख मिळाली. तुम्ही आसामला मोठे केले आणि देशाची युवा ताकदही दाखवून दिली.
यशाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे सहसचिव इम्तियाझ काझी म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खेळाडूंकरीता दिलेल्या सर्व सुविधा आणि सराव शिबीरे यांमुळे तसेच खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे पदकांचा द्विशतकी आकडा यंदाही पार करणे शक्य झाले. तसेच गुवाहटी येथे येण्याकरीता विमानप्रवास व पुन्हा जाण्याकरीता रेल्वेची वातानुकुलित श्रेणीमध्ये प्रवासाची सर्व खेळाडूंना सुविधा देण्यात आली. पुढीलवर्षी देखील असेच यश खेळाडू मिळवतील.* यंदाच्या स्पर्धेतील घवघवीत यश यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राने २० पैकी १९ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. यातील जलतरणात सर्वाधिक ४६ पदकांची (१८, १५, १३) कमाई केली आहे. त्याखालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये ४०, कुस्ती ३१, अॅथलेटिक्स २९, वेटलिफ्टिंग २५ पदके महाराष्ट्राने मिळविली. तसेच यंदाच्या खेलो इंडिया युथ क्रीडा स्पर्धेत सायकलिंग क्रीडा स्पर्धेचा नव्याने समावेश झाला. स्थानिक व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची उंचावणारी कामगिरी पाहता या खेळाडूंकडून खेलो इंडिया स्पर्धेत पदकांची कमाई होणार याची खात्री होती. त्याप्रमाणे महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचे एकूण ५९० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले असून याशिवाय मार्गदर्शक, प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापक, सहव्यवस्थापक असे १४५ मिळून एकूण ७३५ जणांचा समूह स्पर्धेकरीता आला होता.
घरच्या मैदानावर पुण्यामध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले होते. त्यावेळी देखील महाराष्ट्राने एकूण २२७ पदकांसह विजेतेपद मिळविताना ८५ सुवर्ण, ६१ रौप्य, ८१ कांस्य पदके मिळविली होती. यामध्ये महाराष्ट्राला जलतरणात सर्वाधिक ४२ पदके मिळाली होती. यामध्ये १८ सुवर्ण, १४ रौप्य, १० कांस्यपदकांचा समावेश होता. जिम्नॅस्टिकमधील (१४, १३, १२) ३९ पदके, तर, मैदानी स्पर्धेतील ३३ पदकांची (१३, ८, १२) जोड मिळाली होती. बॉक्सिंगमध्येही २३ पदके मिळाली होती. तर, पहिल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने १३ खेळांच्या प्रकारांत ३६ सुवर्ण, ३२ रौप्य, ४३ ब्रॉंझ पदकांसह एकूण ११ पदके मिळवित द्वितीय स्थान पटकाविले होते.